औरंगाबाद : बारा वर्षांपासून बंद असलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय सुरू करण्यासाठी विद्यापरिषदेत ठराव घेऊन राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. या निर्णयाचा भंडाफोड ‘लोकमत’ने केला. यावर विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत प्रा. सुनील मगरे यांनी प्रशासनाला जाब विचारला. तेव्हा कुलगुरूंसह प्रशासनातील एकानेही उत्तर दिले नाही.
सातपुडा विकास मंडळ संस्थेने २००१ मध्ये मोहाडी (ता. कन्नड) येथे वरिष्ठ कला महाविद्यालय सुरू केले. यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संलग्नता दिली. मात्र हे महाविद्यालय २००६-०७ मध्ये बंद पडले. यामुळे विद्यापीठाने २००७ ते २०११ आणि २०११ ते २०१६ च्या बृहत आराखड्यात सतत दहा वर्षे मोहाडी येथे महाविद्यालयासाठी तरतूद केली. त्यानुसार २८ एप्रिल २०१४ रोजी ग्रामीण विकास प्रसारक मंडळाच्या पद्मावती कला व विज्ञान महाविद्यालयाला परवानगी दिली. हे महाविद्यालय सुरू झाले. सातपुडा विकास मंडळ संस्थेने दहा वर्षांपासून बंद असलेले महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी २०१६ मध्ये प्रयत्न सुरू केले. यासाठी विद्यापीठातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदा पद्धतीने बंद काळातील संलग्नता शुल्कही विद्यापीठाकडे भरले. याचा भंडाफोड ‘लोकमत’ने केल्यामुळे संलग्नता देण्याविषयीच्या हालचाली थंडावल्या होत्या. मात्र जालन्यातील ‘पॉवरफुल’ नेत्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने उचल खाल्ली. दोन समित्यानंतर थेट कुलगुरूंनीच मोहाडी येथे महाविद्यालयास भेट दिली.
या भेटीनंतर झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत ठराव घेऊन राज्य सरकारकडे हे महाविद्यालय पुन्हा सुरू करण्यास हरकत नसल्याचा प्रस्ताव पाठविला. याविषयीची कागदपत्रेही माहिती अधिकारात देण्यात येत नाहीत. २० मार्च रोजी विद्यापीठ अधिसभेच्या बैठकीत पाच वर्षांच्या बृहत आराखड्याला मान्यता देताना प्रा. सुनील मगरे यांनी हा विषय उपस्थित केला. बंद पडलेल्या महाविद्यालयाचे संलग्नता शुल्क कोणत्या अधिकारात स्वीकारले. त्याच ठिकाणी दुसऱ्या महाविद्यालयाला परवानगी दिल्यानंतर पुन्हा बंद पडलेले महाविद्यालय कसे सुरू होऊ शकते? यात शासनाचे नियम असलेले दोन कॉलेजमधील अंतर, गावाची लोकसंख्या, महाविद्यालयाची गरज, अशा मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष कशामुळे करण्यात आले, असे विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र यावर अधिसभेचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासह प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने उत्तर न देता चुप्पी साधली. यामुळे याविषयी उलटसुलट चर्चा अद्यापही सुरू आहे.