औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन हब’ अंतर्गत दीन दयाल उपाध्याय कौशल विकास केंद्र, संगणक विज्ञान आणि वनस्पतीशास्त्र विभाग यांनी मागास समाजाच्या सक्ष्मीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) २.६२ कोटी अनुदान मंजूर केले असून, हा उपक्रम राबविण्यासाठी कन्नड तालुक्यातील सहा गावे दत्तक घेण्यात आली आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी २४ मे २०१९ सुरू करण्यात आली. कन्नड तालुक्यातील चिकलठाण, नरसिंगपूर, देवगाव, लोहागाव, नागद आणि अंधानेर या सहा गावांपैकी आतापर्यंत अनुसूचित जाती, जमाती समाजातील लोकांना विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, संगणक आणि औषधी वनस्पती क्षेत्रात विशेष कौशल्य प्रदान करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हब’ने मार्चमध्ये चिकलठाण या गावात उपक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या गावातील २७३ रहिवाशांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय गावात एकूण आठ सुक्ष्म उद्योग सुरू केले आहेत. मराठवाड्यात प्रथमच चार एकर क्षेत्रावर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नेमणूक केलेले कर्मचारी चिकलठाण गावात संपूर्ण कालावधीसाठी राहिले होते.
डॉ. महेंद्र शिरसाट, डॉ. भारती गवळी आणि प्रा. ए. एस. ढाबे यांच्यासह डॉ. रमेश मंझा, डॉ. प्रवीण यन्नावर, डॉ. कुणाल दत्ता, विशाल उशीर, अमोघ सांबरे आणि हिवराळे या तीन विभागांतील तरुण आणि उत्साही प्राध्यापकांचे पथक या गावांना नियमित भेटी देत आहे. कन्नड तालुक्यातील मागास समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. या उपक्रमास कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयाचेही सहकार्य मिळाले आहे.
चौकट........................
तंत्रज्ञान व्हॅनचे १ मे रोजी लोकार्पण
तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाची सुविधा दुर्गम भागात पोहोचविण्यासाठी ‘डीएसटी’ने ‘हब’साठी ‘तंत्रज्ञान व्हॅन’ उपलब्ध करून दिले आहे. ही व्हॅन १ मे रोजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते राष्ट्रसेवेसाठी समर्पित केली जाणार आहे. नजीकच्या काळात, ही व्हॅन सौरऊर्जा, कंट्रोल पॅनेल वायरिंग, पीएलसी प्रोग्रामिंग आणि शेती ऑटोमेशन क्षेत्रासह सुसज्ज आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येताच ‘तंत्रज्ञान व्हॅन’ मराठवाड्यातील रस्त्यांवर उतरेल.