औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स इन पॉलिटिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अधिसभेने २० मार्च रोजीच्या बैठकीत मंजुरी दिली होती. या अभ्यासक्रमास आता विद्यापरिषदेची मंजुरी मिळाली. सर्व तांत्रिक मान्यता पूर्ण झाल्यामुळे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची परिपूर्ण माहिती आणि राजकीय क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी १९५६ साली मुंबईत ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स इन पॉलिटिक्स’ या संस्थेची स्थापना केली. मात्र, संस्थेच्या स्थापनेनंतर काही दिवसांतच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे संस्थेचे काम थांबले. याच धर्तीवर बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात राजकीय प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम. ए. वाहूळ यांनी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना दिला होता. तेव्हा कुलगुरूंनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यासक्रमाचे स्वागत केले. मात्र, काही दिवसांतच कुलगुरूंनी आपली भूमिका बदलत तत्कालीन पदसिद्ध अधिकाऱ्यांच्या विद्यापरिषदेत हा विषय ठेवून नामंजूर केला होता.
यानंतरही डॉ. वाहूळ व त्यांच्या सहकऱ्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. २० मार्च रोजी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेच्या बैठकीत डॉ. जितेंद्र देहाडे यांनी राजकीय प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा ठराव मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आली. मात्र, अभ्यासक्रमाला मान्यता देण्याचा अधिकार हा विद्यापरिषदेचा आहे. त्यामुळे विद्यापरिषदेच्या मंजुरीशिवाय अभ्यासक्रम सुरू होणे शक्य नव्हते. हा ठराव विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी झालेल्या बैठकीत मांडला. त्यास बहुमताने मंजुरी देण्यात आल्याचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी सांगितले. एकदा फेटाळलेला प्रस्ताव निर्वाचित सदस्यांच्या विद्यापरिषदेने मंजूर केला आहे.
तात्काळ कामकाज पूर्ण करणारया अभ्यासक्रमाच्या रचनेसाठी राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य डॉ. जितेंद्र देहाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची पहिली बैठक २७ जून रोजी झाली. डॉ. देहाडे म्हणाले, विद्यापरिषदेने अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिल्यामुळे सर्व तांत्रिक मान्यतांची पूर्तता झाली आहे. आता समितीकडून आपले कामकाज तात्काळ पूर्ण करून एका ऐतिहासिक अभ्यासक्रमांची पायाभरणी केली जाईल.