औरंगाबाद : विद्यापीठातील वनस्पती उद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरून मोठे वादंग पेटले असून अनेक संघटनांनी वेगवेगळे तर्क काढून प्रशासनाला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, कोणतीही पूर्वकल्पना न देता पुतळ्याच्या स्थापत्य कामाचे भूमिपूजन केल्याबाबत बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाला विद्यापीठ प्रशासनाने जाब विचारला आहे.
विद्यापीठाच्या वनस्पती उद्यानात (बॉटनिकल गार्डन) नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची जागा निश्चित झाली असून सार्वजिनक बांधकाम विभागांतर्गत जागतिक बँक प्रकल्पाने पुतळा उभारणीच्या कामाची निविदा काढली. संबंधित कंत्राटदाराला कार्यारंभ आदेशही देण्यात आला आहे. त्यानुसार अक्षय तृतीयेचे मुहूर्त साधून संबंधित कंत्राटदाराने पुतळ्याच्या नियोजित जागेची साफसफाई सुरु केली आणि तेथूनच वादाला सुरुवात झाली.
स्वाभिमानी मुप्टा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विरोध नाही; परंतु त्यासाठी निवडलेल्या जागेमुळे वनस्पतीशास्त्र विभागाचे उद्यान व जैवविविधता नष्ट होण्याची शक्यता वर्तविली आहे. पुतळा उभारणीच्या साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे मोठे प्रदूषण होईल व त्यामुळे दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याचा जास्त धोका आहे. दुसरीकडे, इको निडस् फाऊंडेशननेही हाच धागा पकडत या उद्यानातील अनेक दुर्मिळ वनस्पती नष्ट झाल्यास विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिके व संशोधनाला मुकावे लागेल, अशी शंका उपस्थित केली आहे.
चौकट.....
रीतसर भूमिपूजनापूर्वीच डोकेदुखी वाढली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे रीतसर भूमिपूजन करण्यापूर्वीच विद्यापीठ प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. विविध संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या आक्षेपाला कंटाळून विद्यापीठ प्रशासनाने अखेर बांधकाम विभागांतर्गत जागतिक बँक प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्याला कोणाच्या सांगण्यावरून हा अट्टहास केला, विद्यापीठ प्रशासनाला याबाबत विचारात का घेण्यात आले नाही, असा जाब विचारला आहे.