औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘जी-२० युनिर्व्हसिटी कनेक्ट लेक्चर सिरीज’चे १७ फेब्रुवारी आयोजन करण्यात आले आहे. या परीषदेनिमीत्त शहरात येणाऱ्या पाहूण्यांसोबत विद्यापीठातील २० विद्यार्थीही असणार आहेत. तसेच पश्चिम विभागीय कुलगुरु परिषद २१ व २२ फेब्रुवारी रोजी होत असून उच्च शिक्षणाच्या पुढील दिशा कशी असेल यावर या परीषदेत मंथन होणार आहे. त्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहीती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले, ‘जी-२०’ परिषदेनिमीत्त विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यात मराठवाडयास तसेच विद्यापीठास सहभागी करुन घेण्यात आले, ही अभिमानाची गोष्ट आहे. जी-२० परिषदेनिमित्त शाश्वत विकास, पर्यावरणस्नेही जीवन शैली, क्लायमेट चेंज व ग्लोबल सेक्युरिटी आदी विषयावर व्याख्याने होणार आहेत. यामध्ये नॅशनल रिसर्च लॅब माजी संचालक डॉ. मॅनेजरसिंग, सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रा.ज्योती चंदीरमानी आदी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठाच्या नाटयगृहात येत्या १७ फेब्रुवारी रोजी हे व्याख्यान होईल. या निमित्ताने १० ते ११ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसाठी शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसा याविषया प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकींग स्पर्धा, बिझनेस आयडिया कॉन्टेस्टट आदी स्पर्धा होणार आहेत. कुलसचिव डॉ.भगवान साखळे हे आयोजन समितीचे अध्यक्ष असून डॉ.मुस्तजिब खान हे नोडल ऑफीसर तर बीना सेंगर या समन्वयक असल्याचे प्रकुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.
कुलगुरु परिषदेत मंथनअसोसिएशन ऑफ इंडियन युनिर्व्हसिटीज (एआययु)ने पश्चिम विभागीय कुलगुरु परिषदेचे यजमानपद विद्यापीठाला दिले आहे. येत्या २१ व २२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परिषदेच्या उद्घाटनास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर समारोपास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. एआययुचे पदाधिकारी व उच्च शिक्षण क्षेत्रातील मान्यावरांसह महाराष्ट्र, गोवा, गुजरात व राजस्थानमधील ५० कुलगुरुंनी परिषदेस नोंदणी केली असून उच्च शिक्षण आणि नव्या शैक्षणिक धोरणात पुढील दिशा याविषयावर परिषदेत १०० हून अधिक तज्ज्ञ मंथन करणार आहेत. असे कुलगुरू डाॅ. येवले म्हणाले.