औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर परीक्षा देताना गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा २० ते २२ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे परीक्षा व मूल्यमापन विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.
उन्हाळी-२०२१ च्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सर्व विषयांच्या परीक्षा २९ जुलैपासून घेण्यात आल्या. तांत्रिक कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना लॉगिन करता आले नाही. तसेच ऑनलाईन प्रश्नपत्रिका मिळाल्या नाहीत. त्यामुळे परीक्षा वेळेत देता आली नाही. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता आली नाही, अशाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पुन्हा परीक्षा घेण्याबाबत आदेश दिले आहेत.
सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे सर्व विषय २९ ते ११ ऑगस्ट झालेल्या परीक्षेचा कालावधीतील पुनर्परीक्षेची नवीन तारीख २० सप्टेंबर २०२१ आहे. १२ ते २६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या परीक्षेचा कालावधीतील पुनर्परीक्षा २१ सप्टेंबर रोजी होईल. २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान झालेल्या परीक्षेचा कालावधीतील पुनर्परीक्षा २२ सप्टेंबर रोजी होईल. या परीक्षा केवळ ऑनलाईन माध्यमातून घेण्यात येणार आहे. परीक्षा सकाळी ९ ते सायंकाळी ८ या वेळेत होईल. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वेळा परीक्षा देऊ नये. दोनदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित होणार नाहीत, असे डॉ. योगेश पाटील यांनी कळविले आहे.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आधीच कोरोनामुळे त्रस्त विद्यार्थ्यांना नेटवर्क,वीज पुरवठा,अद्यावत मोबाईल या बाबी सतावत आहेत. त्यात उत्तर लेखनाची भाषा मराठी असताना प्रश्नपत्रिका ही इंग्रजीमध्ये पाठविण्यात येत असल्याने अडचणी येत आहेत. वर्ष वाया जाण्याची भीती असताना फेरपरीक्षा होत असल्याने आता दिलासा मिळाला आहे. - सचिन निकम, रिपब्लिकन विद्यार्थी सेना