औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या हिंदुत्ववादी संघटनेने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी उपस्थित राहणे बंधनकारक केल्याचा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला. याविषयीचे पत्र प्रभारी संचालक डॉ. टी. आर. पाटील यांनी १४ सप्टेंबर रोजी काढल्याचा दावाही सेनेचे पदाधिकारी सचिन निकम यांनी केला.
‘अभाविप’तर्फे स.भु. महाविद्यालय ते क्रांतीचौक, अशी ११११ फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची यात्रा काढली होती. या यात्रेत विद्यापीठाच्या रासेयो स्वयंसेवकांना उपस्थित राहण्यासाठी संचालक डॉ. टी. आर. पाटील यांनी १४ सप्टेंबर रोजी कार्यालयीन परिपत्रकाद्वारे आदेश दिले. ‘एनएसएस’ला ‘आरएसएस’शी जोडण्याचा प्रकार बेकायदेशीर असून, त्यामुळे आंबेडकरी विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाल्याचा दावाही निवेदनाद्वारे केला आहे. या निषेधार्थ आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या निवेदनावर सचिन निकम, अॅड. अतुल कांबळे, अविनाश जगधने, अविनाश कांबळे, प्रा. प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, अॅड. प्रसेनजित एडके, सागर शहा, गजानन कांबळे, महेंद्र तांबे, विवेक सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रभारी संचालकांना पदावरून हटवाविद्यापीठ प्रशासनाने केलेला प्रकार बेकायदेशीर आहे. यासाठी रासेयोचे प्रभारी संचालक डॉ. टी. आर. पाटील यांना पदावरून हटविण्याची मागणी संघटनेने केली. हा प्रकार कोणाच्या इशाऱ्यावर करण्यात आला, याचा जाबही कुलगुरूंना विचारण्यात येणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
आमचा उद्देश केवळ राष्ट्रभक्ती तिरंगा यात्रा ही कोणत्या पक्षाची म्हणून नव्हे तर तिरंग्याचा सन्मान करण्यासाठी मोठे काम उभे के ले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी पत्र काढले. आमचा उद्देश केवळ राष्ट्रभक्ती हाच आहे. पक्ष, संघटनांशी काहीही देणे-घेणे नाही.- डॉ. टी.आर.पाटील, प्रभारी संचालक, रासेयो