राम शिनगारे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाचे पहिले प्रभारी कुलसचिव डॉ. एस. जी. गुप्ता यांची महिनाभरापूर्वीच पदावरून हकालपट्टी झाली आहे. त्यांचा पदभार ज्येष्ठ प्रा. डॉ. व्ही. आर. सी. कृष्णेय यांच्याकडे सोपविला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय डॉ.गुप्ता यांच्याकडे असलेली विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) पदाची सेवाही खंडित करण्यासाठी राज्याच्या उच्चशिक्षण विभागाला कुलगुरूंनी पत्र लिहिले असल्याचे समजते.औरंगाबाद शहरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा २००९ साली करण्यात आली होती. मात्र हे विद्यापीठ २०१७ या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला कार्यान्वित झाले आहे.या विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. एस. सूर्यप्रकाश यांची नेमणूक झाल्यानंतर विद्यापीठ स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला. तेव्हा राज्य सरकारने कुलगुरूंना मदत करण्यासाठी शासकीय न्याय सहायक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. जी. गुप्ता यांची ओएसडीपदी निवड केली होती. तेव्हापासून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात आली. विद्यापीठाचे कामकाज चालविण्यासाठी प्रभारी कुलसचिव, वित्त व लेखाधिकारीपदाचा पदभार डॉ. गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आला. यामुळे विद्यापीठ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सेवा-सुविधांची खरेदी डॉ. गुप्ता यांच्या माध्यमातूनच होत होती. मात्र डॉ. गुप्ता यांची कार्यपद्धती कडक शिस्तीचे प्रशासक असलेले कुलगुरू डॉ. सूर्यप्रकाश यांना आवडली नाही. यामुळे डॉ. गुप्ता यांना विद्यापीठाच्या नोकरभरतीपासून पूर्णपणे अलिप्त ठेवण्यात आले होते. याशिवाय विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्राच्या सुुरुवातीला झालेल्या कार्यक्रमातही त्यांना स्थान मिळाले नव्हते. यानंतर काही दिवसांतच कुलगुरूंनी त्यांच्याकडून प्रभारी कुलसचिवपदाचा पदभार काढून घेऊन ज्येष्ठ प्रा. डॉ. व्ही. आर. सी. कृष्णेय यांच्याकडे दिल्याचे समजते. तसेच पूर्णवेळ वित्त व लेखाधिकारी नेमण्यात आल्यामुळे वित्त विभागाचा पदभारही आपोआप काढला गेला. याशिवाय कुलगुरू उच्चशिक्षण विभागाच्या सचिवांना डॉ. गुप्ता यांच्या सेवेची गरज नसून, त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यासाठीचे पत्रही पाठविले आहे. यावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र कुलगुरूंनी डॉ. गुप्ता यांना सर्व कामांच्या जबाबदारीतून मुक्त केले आहे. तसेच डॉ. गुप्ता हेसुद्धा विद्यापीठाच्या कार्यालयाकडे जात नव्हते. गेले तरी त्यांना तेथे कोणी विचारत नसल्याचे समजते. या सर्व घटनांना डॉ. गुप्ता यांनी दुजोरा दिला आहे.९ डिसेंबरला मुख्यमंत्री येणारऔरंगाबाद शहरात नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ९ डिसेंबर रोजी येणार आहेत. कांचनवाडी येथे विद्यापीठासाठी देण्यात आलेल्या जागेत हा कार्यक्रम सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.विधि विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव, वित्त व लेखाधिकारीपदाचा पदभार काढून घेऊन दुसºयांना दिला आहे. याशिवाय उच्चशिक्षण विभागांना पत्र पाठवून कुलगुरूंनी ओएसडीची सेवाही खंडित करण्याची मागणी केल्याचे मला समजले. या घटना खºया आहेत. हे निर्णय कशामुळे घेण्यात आले याविषयी आपणाला कल्पना नाही.- डॉ. एस. जी. गुप्ता, ओएसडी, विधि विद्यापीठ
विधि विद्यापीठ; प्रभारी कुलसचिवांचा काढला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 1:01 AM