- स. सो. खंडाळकर
नामांतराचा लढा हा कुठल्या भौतिक स्वार्थासाठी नव्हता तर तो लोकशाहीच्या इभ्रतीचा लढा होता. १६ वर्षांच्या संघर्षानंतर हा लढा यशस्वी झाला. लोकशाहीचा विजय झाला, असे मी मानतो’ असे लाँग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. विद्यापीठ नामांतर रौप्यमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते लोकमतशी बोलत होते. प्रा.कवाडे हे आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. ‘लाँग मार्चचे प्रणेते, कट्टर नामांतरवादी नेते’ अशीच त्यांची आजही ओळख आहे. जहाल भाषणांमुळे त्याकाळी ते अत्यंत लोकप्रिय ठरले होते. महाराष्ट्रातील तत्कालीन ३३ जिल्ह्यांपैकी प्रा.कवाडे यांच्यावर २० जिल्ह्यांमध्ये प्रवेश व भाषणबंदी होती. तर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त रिबेरो यांनी त्यांच्यावर सहा महिने मुंबईत प्रवेशबंदी घातली होती.
२७ जुलै १९७८ रोजी मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर झाला आणि त्याची बातमी जशी पसरली, तसा मराठवाड्यात उद्रेक सुरू झाला. बौद्ध, दलित जनतेच्या वस्त्यांवर हल्ले सुरू झाले. जाळपोळ सुरू झाली. पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे यांना ठार करण्यात आले. पण शासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. दलितांचे संरक्षण केले नाही म्हणून मी नागपुरात पहिला मोर्चा काढला. मोर्चाहून लोक परत जात होते, तेव्हा नागपूरच्या इंदोरा भागात पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ११ भीमसैनिक ठार झाले, अशी माहिती देऊन कवाडे यांनी सांगितले की, पुढे महाराष्ट्र राज्य मराठवाडा विद्यापीठ नामांतर कृती समिती स्थापन करून नामांतराच्या मुद्यावरून सुरूअसलेला अन्याय मी जगाच्या व देशाच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय घेतला आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवरून लाँग मार्च सुरू झाला.
२८ नोव्हेंबर १९७९ रोजी सिंदखेडराजाजवळ राहेरी गावात हा लाँग मार्च अडवण्यात आला. पोलिसांनी या गावाला वेढा घातला. रात्री ११ वा. लाठीहल्ला सुरू करण्यात आला आणि भीमसैनिकांना ताब्यात घेऊन राज्यातील विविध तुरुंगांमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली. मला अमरावतीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांनी छळले नसेल, त्याहीपेक्षा जास्त त्रास मला देण्यात आला.
औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेशबंदी असतानाही प्रा. जोगेंद्र कवाडे सभा घेऊन निघून जातात, याचा राग मनात धरून कश्यप हे पोलीस आयुक्त असताना नागसेनवनात दलित मुक्ती सेनेचे अधिवेशन सुरू असताना माझ्यावर असाच लाठीहल्ला करण्यात आला. त्याच्या जखमा मनामनातून अद्यापही मिटल्या नाहीत. मानवी मूल्यांसाठी आम्ही हा लढा लढला. शिवबा, महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेचा हा लढा होता. त्यात विजय झाला, याचा आनंद आहे. नामांतर लढ्यात भीमसैनिकांनी जी कुर्बानी दिली त्याला इतिहासात तोड नाही. जगाच्या इतिहासात ही अभूतपूर्व घटना होय, अशी प्रतिक्रिया कवाडे यांनी नोंदविली.