औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या संशोधक विद्यार्थ्यास पीएच.डी. व्हायवासाठी पैसे मागितल्याच्या प्रकरणात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या आदेशानुसार चौकशीला सुरुवात झाली आहे. पीएच.डी.चे मार्गदर्शक तथा अधिष्ठाता आणि संशोधक विद्यार्थ्यास खुलासा करण्यासाठी परीक्षा संचालकांनी नोटीस पाठविली आहे. या नोटिसीचे १५ दिवसांमध्ये उत्तर देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा पीएच. डी.चे मार्गदर्शक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यास व्हायवासाठी बहिस्थ परीक्षकाला पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केलेल्या आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. याविषयी व्यवस्थापन परिषद सदस्यांनी कुलगुरूंकडे १२ आॅगस्ट रोजी तक्रार दाखल केली. यानंतर आॅडिओ ‘लोकमत’ला प्राप्त झाल्यानंतर १७ आॅगस्ट रोजी ‘पीएच.डी. ‘व्हायवा’साठी मोजा ६० हजार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले होते. याची दखल घेत कुलगुरूंनी त्याच दिवशी अधिष्ठातांना सक्तीच्या रजेवर पाठविले होते.
यासाठी विविध प्राध्यापक संघटनांनी कुलगुरूंच्या दालनात आंदोलनही केले होते. यानंतर दुुसऱ्या दिवशी कुलगुरूंच्या आदेशानुसार आॅडिओ प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती कागदपत्रांवरून समोर आली आहे. परीक्षा संचालकांनी मार्गदर्शक आणि संशोधक विद्यार्थ्यास व्यवस्थापन परिषद सदस्यांची केलेली तक्रार आणि ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीच्या अनुषंगाने १५ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश मेलद्वारे दिलेल्या नोटिसीच्या माध्यमातून दिले होते.
या आदेशानुसार संबंधित विद्यार्थ्याने संचालकांच्या मेलला उत्तर देत व्यवस्थापन परिषद सदस्यांची तक्रार आणि छापून आलेल्या वृत्ताविषयी आपणास कल्पना नाही, नाशिक येथे राहत असल्यामुळे व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिप आणि तक्रारी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे विद्यापीठ संचालकांनी छापून आलेले वृत्त आणि व्हायरल झालेल्या क्लिप मला पाठवाव्यात, त्या आधारे विद्यापीठाने मागितलेले पुरावे आणि दस्तऐवज देता येईल, असे स्पष्ट केले आहे, तर अधिष्ठाता डॉ. अमृतकर यांनी अद्याप खुलासा केलेला नसून, १५ दिवसांचा अवधी असल्यामुळे वेळेपूर्वी उत्तर देण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चौकशीला सामोरे जाण्यास तयार : अधिष्ठाताविद्यापीठाच्या पीएच.डी.च्या नियमानुसार संपूर्ण कर्तव्य बजावले आहे. विद्यार्थ्यांचे संशोधन पूर्ण करून घेत सर्व अहवाल सकारात्मक दिले. व्हायवा आयोजित करण्यासाठी पीएच.डी. विभागाशी वारंवार पत्रव्यवहार केला. एकदा व्हायवा आयोजित केला होता. मात्र बहिस्थ परीक्षकाने रद्द केला. त्यात मार्गदर्शकाची काही चूक नाही. यानंतर आॅनलाईन व्हायवासाठी पाठपुरावा केला. याउपरही काही तक्रार असेल, तर विद्यापीठ कायदा आणि नियमाप्रमाणे कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.