औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांना १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र, मूल्यांकनासाठी प्राध्यापकच येत नसल्यामुळे तब्बल ८ लाख ९ हजार ३०० उत्तरपत्रिका तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. शनिवारी ४ हजार ८५२ प्राध्यापकांपैकी अवघे ८६३ प्राध्यापकच रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पदवी परीक्षांना सुरुवात होऊन महिना उलटला आहे. बहुतांश अभ्यासक्रमांच्या परीक्षा संपल्या आहेत. यांचे निकाल ३० दिवसांत लावण्याचे आवाहन आहे. उत्तरपत्रिका तपासून गुणांचे एकत्रीकरण करून संगणकात अपलोड कराव्या लागतील. त्यानंतर पुन्हा तपासणी होऊन गुणपत्रिका छपाई केली जाईल. या उत्तरपत्रिकाच तपासण्यात येत नसल्याने पदवीचे निकाल तीन महिन्यांपर्यंत लांबण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या परीक्षा संपताच अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि विधिच्या परीक्षांना सुरुवात होईल. यामुळे पदवीचे निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.
कागदोपत्री प्राध्यापकांची संख्या अधिकविद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये ४ हजार ८५२ प्राध्यापक कार्यरत असल्याची आकडेवारी विद्यापीठ प्रशासनाकडे आहे. यातील सर्वच प्राध्यापकांना मूल्यांकनासाठी रुजू होण्यासाठी तीन वेळा पत्रव्यवहार परीक्षा विभागाने केला; मात्र बहुतांश प्राध्यापकांनी रुजू न झाल्याच्या कारणाचा खुलासाही केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश प्राध्यापक फक्त कागदोपत्रीच असल्याची माहितीही समोर आली आहे, तसेच रुजू झालेल्यांमध्ये बहुतांश जण तासिका तत्त्वावरील प्राध्यापक आहेत.
...कायदा काय सांगतोमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ४८ पोटकलम ४ अन्वये विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व संस्थेतील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाºयांना परीक्षेचे कार्य करणे बंधनकारक आहे. यात कसूर केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. या तरतुदीनुसार परीक्षा विभागाने ४ हजार ८५२ प्राध्यापकांशी पत्रव्यवहार केला आहे. उत्तरपत्रिका तपासल्याशिवाय निकाल लागणार नाहीत. निकाल वेळेत लावण्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाचा उत्तरपत्रिका तपासण्यात हातभार लागला पाहिजे. कायद्याने तसे बंधन घातले आहे. त्याचे पालन सर्वांनी करण्याची अपेक्षा आहे. अन्यथा कुलगुरूंच्या सल्ल्यानुसार पुढील पावले उचलली जातील.-डॉ. जयश्री सूर्यवंशी, संचालक, परीक्षा विभाग