औरंगाबाद : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ, कायदा (अधिनियम) २०१६ मध्ये सुधारणा समिती शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार आहे. यावेळी मराठवाड्यातील दोन्ही अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू यांच्यासह प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाच्या नाट्यगृहात शनिवारी सकाळी १० ते ५ दरम्यान होणाऱ्या या सभेस समितीचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, डॉ. बाबूराव साबळे, डॉ. नरेंद चंद्रा, प्रा. शीतल देवरुखकर, डॉ. तुकाराम शिवरे व उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने आदी सदस्य उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी तसेच संवैधानिक अधिकारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे व दोन्ही विद्यापीठांचे संवैधानिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्यासाठी १९ ऑक्टोबर २०२० रोजीच्या आदेशान्वये समिती गठित केली आहे. ३ नोव्हेंबर २०२० रोजी झालेल्या या समितीच्या सभेत विविध उपसमित्या गठित करण्यात आलेल्या आहेत. दिवसभराच्या या बैठकीत दोन्ही विद्यापीठांतील संवैधानिक अधिकारी, अधिकारी, विभागप्रमुख, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यार्थी प्रतिनिधी, प्राध्यापक प्रतिनिधी, सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड, डॉ. नलिनी टेंभेकर आदी उपस्थित राहणार आहेत.