छत्रपती संभाजीनगर : मागील तीन वर्षांनंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जलतरण तलाव शहरवासीयांसाठी सुरू करण्यात आला आहे.
विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने जलतरण तलावाचे नूतनीकरण केल्यानंतर मंगळवारी या जलतरण तलावाचा प्रारंभ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, ज्योती येवले, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, प्रशिक्षण किरण शूरकांबळे, अभिजित दिख्खत, मसूद हाश्मी, एस.जी. शिंदे, जितेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.
विद्यापीठातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, तसेच शहरातील नागरिकांसाठी मासिक शुल्क भरून हा जलतरण तलाव उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी व पुरुषांची, तसेच विद्यार्थिनी व महिलांची वेगळी बॅच असणार आहे. संबंधितांनी क्रीडा विभागात भेट देऊन नाव नोंदवावे, असे संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी कळविले आहे. याप्रसंगी कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, आपल्या क्रीडा विभागाला मोठी परंपरा असून आपण ती पुढे नेली पाहिजे. विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ॲथेलेटिक ट्रॅक तयार होत आहे. आगामी काळात स्विमिंग पूलदेखील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्याइतपत उत्तम व्हावा. जलतरण तलाव सुरू करण्याचे काम नियोजित वेळेत विभागाने पूर्ण काम केले याचा आनंद आहे.