औरंगाबाद : मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य ती दिशा मिळाल्यास आपले कर्तृत्व सिध्द करतात, हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. हे विद्यापीठ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जात असून गेल्या काही दिवसांपासून काही अनिष्ठ मंडळी विद्यापीठात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, आपण सर्वांनी विद्यापीठाच्या प्रगतीशी बांधील रहावे, चुकीच्या प्रवृत्तींना थारा देऊ नये, असे आवाहन कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलगुरू डॉ. येवले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर मंगळवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. शाम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, विद्यार्थी विकास संचालक डॉ. मुस्तजिब खान, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. चेतना सोनकांबळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख, डॉ. फुलचंद सलामपुरे आदींची उपस्थिती होती. येवले म्हणाले, विद्यापीठाकडे लोक मोठ्या आशेने पाहतात. त्या लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्न करीत आहोत. कोरोनानंतरचे जनजीवन सुरळीत होत असून विद्यापीठ पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत बहरुन जाईल. सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी सुरेश परदेशी यांनी केले.