औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व ‘महिको’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामाध्यमातून ‘बौद्धिक संपदा हक्क’ यासह विविध संशोधन प्रकल्पास गती मिळेल, असा विश्वास कुलगुुरु डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भालचंद्र वायकर, ‘डीएसटी-फिस्ट’ प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ. रत्नदीप देशमुख, संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन देशमुख हे तसेच ‘महिको’चे मुख्य वैज्ञानिक अधिकारी डॉ. भारत आर. चर व वैज्ञानिक डॉ. स्मिता व्ही. कुरुप यांची उपस्थिती होती.
या करारांतर्गत महिको व विद्यापीठात ‘बौद्धिक संपदा हक्क’ व संशोधन प्रकल्पाबाबत अदान-प्रदान करण्यात येणार आहे. कपाशीवर पडणारे रोग तसेच ‘सॉईल ऑर्गेनिक कार्बन’ यासंबंधी उपग्रहाच्या माध्यमातून संशोधन करण्यात येणार आहे. ‘महिको’च्या उषा बारवाले यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. आगामी तीन वर्षे या कराराची मुदत असणार आहे. विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आणि डॉ. रत्नदीप देशमुख, तर ‘महिको’च्या वतीने डॉ. भारत चर व डॉ. स्मिता कुरुप यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
चौकट...........................................
संशोधन प्रकल्पास चालना मिळेल
जालना हा ‘सीड हब’ म्हणून ओळखला जात असून विद्यापीठ कार्यक्षेत्रात हा जिल्हा येतो. त्यामुळे संगणकशास्त्र विभागातील ‘डीएसटी फिस्ट’ प्रकल्पांतर्गत झालेला हा करार संशोधन प्रकल्प आणि ‘पेटंट’साठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास कुलगुरु डॉ. येवले यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, करारासाठी विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल डॉ. चर यांनी समाधान व्यक्त केले.