औरंगाबाद : विद्यापीठ परिसरात विविध प्रजातीचे सुमारे ४० हजार झाडे असून त्यामुळेच या परिसराला ‘ऑक्सिजन हब’ म्हणून ओळखले जाते. मात्र, अलीकडे उन्हाळ्यामध्ये काही वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत असून वनराई जिवंत ठेवण्यासाठी तलाव, बारव व विहिरींच्या पुनर्भरणाचा उपक्रम हाती घेण्याच्या हालचाली विद्यापीठ प्रशासनाने सुरु केल्या आहेत.यासंदर्भात गेल्या आठवड्यात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी संपूर्ण विद्यापीठ परिसरात फेरफटका मारुन झाडे, तसेच जलस्त्रोतांची पाहणी केली. विद्यापीठात ४५ बारव व विहिरी आहेत. गाळामुळे त्यांचे झरे बंद झाले आहेत. पावसाळ्यात जमा झालेले पाणी अल्पावधीतच आटून जाते. परिसरातील तलाव, बारव, विहिरींच्या पुनर्भरणाकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी स्थावर विभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून पावसाळ्यापूर्वी पुनर्भरणाचा उपक्रम राबविण्याच्या संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
तत्कालीन कुलसचिव डॉ. मानवेंद्र काचोळे यांनी विद्यापीठ परिसरातील विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला; पण त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यानंतर सन २०१७-१८ मध्ये विद्यापीठातील वसतिगृहे व उद्याने, झाडांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. झाडांसाठी टँकरने पाणी विकत घेऊन देण्याची वेळ विद्यापीठावर आली होती. मागील वर्षापासून कोविडमुळे वसतिगृहे बंद असल्यामुळे सांडपाण्याची टंचाई जाणवली नाही. मात्र, ती पुढील काळात जाणवू शकते, हे गृहित धरुन पुढील काळात विद्यापीठ परिसर पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत.
चौकट.....
कचरा, प्लास्टिकचा खच
सोमवारी सेवानिवृत्त झालेले विद्यापीठाचे उद्यान अधीक्षक डॉ. गोविंद हुंबे यांनी सांगितले की, विद्यापीठ परिसरात मागील ३० वर्षांपूर्वी अवघे ४ उद्याने व २० कुंड्या होत्या. सध्या दीडशे एकर क्षेत्रावर ७ हजार २१५ विविध फळझाडे असून यासह संपूर्ण परिसरात सुमारे ४० हजार वृक्ष आणि ३५ उद्याने बहरली आहेत. त्यामुळेच हा परिसर ‘ऑक्सिजन हब’ म्हणून ओळखला जात असून शुद्ध ऑक्सिजन घेण्यासाठी रोज सकाळ- संध्याकाळ शहरातील नागरिक फिरण्यासाठी विद्यापीठात येत आहेत. फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा विद्यापीठ परिसरात न फेकता ‘ऑक्सिजन हब’ सुरक्षित राहील, याची काळजी घेतली पाहिजे.