औरंगाबाद : शहरातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. नागरिकांनी गाफील न राहता जबाबदारीने वागावे, गर्दीची ठिकाणे टाळावीत, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. गुरुवारी पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडचा जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये वाढ झाल्याचे आढळून आल्यास शहरात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
राज्य सरकारने ब्रेक द चेनअंतर्गत निर्बंध हटविण्यासाठी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड हे नियम लागू केले आहेत. ज्या शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेडची संख्या २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा शहरांचा पहिल्या लेव्हलमध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिकेचा पहिल्या लेव्हलमध्ये समावेश झाल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असून, व्यवहार सुरू झाले आहेत. याबद्दल मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी सोशल मीडियाद्वारे नागरिकांचे अभिनंदन केले. नागरिकांनी शिस्त पाळल्यामुळेच शहराचा पहिल्या लेव्हलमध्ये समावेश झाला आहे.
दर आठवड्याच्या गुरुवारी जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडचा आढावा घेतला जाईल. यामध्ये शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळून आल्यास सर्व व्यवहार सुरू राहतील. त्यामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येताच निर्बंध वाढवून तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात शहराचा समावेश होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता जबाबदारीने वागावे. स्वयंशिस्त पाळावी, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, नियमांचे काटेकोरपणे पालन करून शहराला पहिल्या लेव्हलमध्येच ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले.
ऑक्सिजनचे ८०० बेड वाढविणारशहरात ऑक्सिजन बेडची कमतरता असल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ऑक्सिजनचे ८०० बेड वाढविले जातील. कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली जाईल. त्यासोबतच कोरोना चाचण्या देखील वाढविण्यात येतील, असे मनपा प्रशासक पाण्डेय यांनी सांगितले.