औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी रोहयो शाखेमार्फत आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क उपस्थित राहिलेल्या वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वत:च दंड आकारून कारवाई करीत मास्क दिला.
वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बानखेले, वाहनचालक साईनाथ चंदनसे, ज्ञानेश्वर त्रिभुवन यांनी मास्क परिधान न केल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारून एक मास्क त्यांनी दिला. मंगळवारी सरकारी अधिकाऱ्यांनाच दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. दरम्यान, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सोमवारच्या बैठकीत सांगितले की, पावतीपुस्तक आणि मास्क घेऊनच मी दालनात बसणार आहे.
दालनात पावतीपुस्तक घेऊन बसणारजिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारच्या बैठकीत सांगितले की, अभ्यागत म्हणून कुणी भेटण्यास आले आणि त्यांनी मास्क घातलेला नसेल, तर स्वत: दंडात्मक कारवाई करून ५०० रुपयांची पावती आणि एक मास्क देईल. यासाठी पावतीपुस्तक आणि मास्क माझ्या दालनात मी ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.