अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 PM2021-02-05T19:11:15+5:302021-02-05T19:46:29+5:30
अंबाजोगाई नगरपरीषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते.
अंबाजोगाई - अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. सध्या राजकिशोर मोदी हे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी मोदी यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद भूषविले आहे.
अंबाजोगाई नगरपरीषदेच्या या पंचवार्षिक निवडणुकीतील हे शेवटचे वर्ष आहे. या शेवटच्या वर्षी काँग्रेस पक्षाचा उपनगराध्यक्ष होईल हे पूर्वीच ठरलेले होते. त्यामुळे यावर्षी काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी यांची निवड उपनगराध्यक्ष म्हणून होणार हे निश्चित झाले होते. अंबाजोगाई नगरपरीषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. 5 ) नगरपरीषद सभागृहात सर्व सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या वतीने दोन फॉर्म दाखल करण्यात आले होते. बैठकीत २३ नगरसेवकांनी राजकिशोर मोदी यांची उपनगराध्यक्ष निवडीसाठी पाठींबा दिला. त्यातील नगरसेवक मनोज लखेरा यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस पक्षाचे विद्यमान गटनेते राजकिशोर मोदी यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. यानंतर कार्यकर्त्यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर आतिषबाजी करत पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. बैठकीस मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा रचना सुरेश मोदी, सभाग्रह अधिक्षक ए.जे.चव्हाण यांची उपस्थिती होती.
मागील 25 वर्षांपासून नगरपरिषदेत प्रतिनिधित्व
सध्या राजकिशोर मोदी हे बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी मोदी यांनी अंबाजोगाई नगरपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षपद भूषविले आहे. अंबाजोगाई शहरातील सर्व आठरापगड जाती धर्मातील समाज बांधवांना सोबत घेऊन मोदी हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. एक मितभाषी व अभ्यासू राजकीय,नेतृत्व म्हणून मोदींकडे पाहीले जाते. मागील 25 वर्षांपासून अंबाजोगाईकर जनतेने नगरपरिषद निवडणूकीत वेळोवेळी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळेच सर्वसामान्य अंबाजोगाईकर जनतेच्या विश्वासाला पात्र राहून शहराच्या सर्वांगीण विकासाकरीता सर्वांना सोबत घेऊन राजकिशोर मोदी हे कार्यरत आहेत. मोदी यांच्या निवडीचे अंबाजोगाईकर जनतेतून स्वागत होत आहे.