- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : निवडणुकीच्या धामधुमीत सिमेंट उत्पादकांनी हात धुऊन घेण्यास सुरुवात केली आहे. दीड महिन्यात सिमेंटचे दर प्रतिगोणी तब्बल ४० टक्के म्हणजेच १०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. सिमेंटच्या दरातील ही सर्वात मोठी वाढ असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. या दरवाढीचा परवडणाऱ्या घरांच्या योजनेला फटका बसणार आहे. सिमेंट कंपन्यांनी निवडणुकीसाठी फंड दिल्यामुळे त्याची भरपाई ग्राहकांकडून करण्यात येत असल्याची व्यापाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे.
एकीकडे २०२२ पर्यंत सर्वांना घरे असा गाजावाजा केला जात आहे. त्यासाठी परवडणाऱ्या घरांच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने काही सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, दुसरीकडे बांधकामात सर्वात महत्त्वाचे असलेल्या सिमेंटच्या भाववाढीने आजपर्यंतचा उच्चांक गाठला आहे. परिणामी, परवडणारे घर स्वप्नच ठरते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दीड महिन्यापूर्वी ५० किलो वजनाची सिमेंटची गोणी २६० ते २८० रुपये विकली जात होती. गोणीचे भाव वधारून आजच्या घडीला चक्क ३६० ते ३८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
औरंगाबाद सिमेंट डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोज रुणवाल यांनी सांगितले की, एरव्ही भाव ५ ते १० रुपये कमी-जास्त होत असतात. १० वर्षांपूर्वी कंपन्यांनी एकदम ३२ रुपयांची वाढ केली होती. ही भाववाढ सर्वात जास्त होती; पण इतिहासात पहिल्यांदाच दीड महिन्यात ११५ ते १३० रुपयांनी सिमेंट महाग होऊन किमती ४०० रुपयांच्या जवळ पोहोचल्या आहेत. त्यामुळे सिमेंटपासून तयार होणारे पाईप, टाईल्स, पेव्हरब्लॉक आदींच्या किमतीही वाढल्या आहेत. बांधकाम व्यावसायिकांना जीएसटीवर ६ टक्के रिबेट मिळत असे. १ एप्रिलपासून ते बंद करण्यात आले आहे. उदा. १ हजार स्क्वेअर फुटांचा फ्लॅट आहे. त्यास ३ हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट बांधकाम किंमत येते. जानेवारी महिन्यात ३० लाख रुपये बांधकाम खर्च लागत होता. आता ३३ लाख ५० हजार रुपये एवढा खर्च लागत आहे. म्हणजेच फ्लॅटमागे साडेतीन लाख रुपयांची वाढ झाली. याचा मोठा फटका सर्वसामान्य गृहेच्छुकांना बसणार आहे. तसेच परवडणाऱ्या घरांच्या योजनांचे बजेटही महागणार आहे.
दबक्या आवाजात चर्चाकंपन्यांनी सिमेंटच्या दरात केलेली वाढ ही कृत्रिम वाढ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी आणि पुरवठा किंवा सरकारच्या करनीतीचा सद्यस्थितीत कोणताही परिणाम सिमेंटच्या दरावर झालेला दिसत नाही. असे असतानाही दर का वाढले याचे कारण कंपन्यांनी निवडणूक फंड म्हणून पैसा दिला असून आता ती रक्कम वसूल करण्यात येत आहे. व्यापारी वर्गामध्ये ही चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
प्रतिगोणीमागे लागतो १०० रुपये जीएसटी सिमेंटवर २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. सध्या सिमेंटची एक गोणी ३६० रुपयांना विकली जात आहे. यात १०० रुपये जीएसटीचा समावेश आहे. सिमेंटवरील जीएसटी १८ टक्क्यांवर आणण्यात यावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांकडून होत आहे.
महिन्याकाठी शहरात ८० हजार टन सिमेंटचा खप औरंगाबाद शहरात महिन्याकाठी ८० हजार टन सिमेंटची विक्री होते. (१६ लाख गोणी). होलसेलमध्ये ३४० रुपयांना एक गोणी मिळते. महिन्याभरात ५४४ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. किंमत वाढल्याने अतिरिक्त २०८ कोटी रुपये शहरवासीयांच्या खिशातून जात आहेत.
परवडणाऱ्या घरांच्या योजनेला फटका दरवर्षी मे-जून महिन्यामध्ये सिमेंटच्या किमती २५० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचतात व नंतर २०० रुपयांपर्यंत कमी होतात. मात्र, पहिल्यांदाच सिमेंटची किंमत १०० रुपयांनी महागली आहे. परिणामी, बांधकामात प्रति चौरस फुटामागे ५० रुपयांनी वाढ झाली आहे. याशिवाय जीएसटीचे इनपुट क्रेडिटचे बेनिफिट बांधकाम व्यावसायिकांना मिळत नसल्याने ते प्रति चौरस फुटामागे १५० ते २०० रुपये वाढले. सिमेंटचे पाईप, पेव्हरब्लॉक, स्टाईल, ढापे आदींच्या किमती वाढल्या व त्यात कामगारांची मजुरी वाढली, असा एकंदरीत प्रति चौरस फुटामागे ४०० ते ५०० रुपये खर्च वाढला आहे. यामुळे परवडणाऱ्या घरांच्या योजेनला फटका बसू शकतो.-नितीन बगडिया, उपाध्यक्ष, क्रेडाई