औरंगाबाद: इंग्रजी शाळाचालक विश्वास चंद्रशेखर सुरडकर (रा. श्रीकृष्णनगर,सिडको एन-९ ) यांच्या हत्येप्रकरणी शहर गुन्हेशाखेने शिक्षिकेच्या पतीला अटक केले. काही महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी १३ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली. हत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून खूनाच्या घटनेनंतर तब्बल पंधरा दिवसांनी या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हेशाखेला यश आले.
अज्जू उर्फ अजय बिसमील्ला तडवी (वय ३३,रा. नॅशनल कॉलनी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त म्हणाले की, विश्वा सुरडकर यांची हत्या ३० मार्च रोजी रात्री दोरीने गळा आवळून आणि धारदार शस्त्राने गळा चिरून हिमायत बागेतील बांबूबेटात करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीत चार जणांची नावे होती. त्यापैकी राजू दिक्षीतला पोलिसांनी अटक करून चौकशी केली. अन्य लोकांचीही चौकशी केली. मात्र या घटनेशी त्यांचा संबंध दिसत नव्हता. एवढेच नव्हे तर विश्वास यांच्या जवळच्या आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित असे समुारे ५० जणांची चौकशी करून त्यांना सोडून दिले.
विश्वास यांचे घर ते घटनास्थळापर्यंतचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. सीसीटिव्ही कॅमेऱ्यात घटनेच्या रात्री अज्जू तडवी हा घरी जाताना दिसला. यामुळे आज १३ एप्रिल रोजी दुपारी पोलिसांनी अज्जूला गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य अधिकारी,कर्मचाऱ्यांनी उचलले, चौकशीअंती त्याने विश्वासची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत त्याच्या बुटावर रक्ताचे पुसटसे डाग आणि महत्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलीस आयुक्तांनी केला. हा खून करण्याचा उद्देश काय, याबाबत अज्जू सध्या उलट-सुलट उत्तरे पोलिसांना देत आहे. न्यायालयाकडून त्याची पोलीस कोठडी घेऊन याबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली जाणार आहे.
अज्जूची पत्नी होती विश्वास यांच्या शाळेवर कार्यरतआरोपी अज्जू हा हडको कॉर्नर येथे खाद्य पदार्थ विक्रीचा गाडा चालवितो. मृत विश्वास सुरडकर यांच्या शाळेवर आरोपी अजयची पत्नी शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र काही कारणामुळे २०१५मध्ये त्यांनी नोकरी सोडली होती. तेव्हापासून अज्जू आणि मृत विश्वास यांच्यात चांगली ओळख होती. दोघे सतत परस्परांना भेटत. अज्जूच्या गाड्यावर खाद्य पदार्थ खाण्यासाठी विश्वास जात असे.