शासनाने १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्याचे लसीकरण सुरू केले. त्यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात एकमेव केंद्र सुरू केले. अर्थात ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर मोबाईलवर आलेल्या संदेशानुसार दिनांक व वेळेनुसार लस देण्यात येत होती.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर आलेल्या मात्रांचा वापर दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यासाठी करण्याच्या सूचना आहेत. तथापि आधारकार्डावरील जन्मतारखेची पडताळणी न करता आणि नोंदणी न करता चिकलठाण केंद्रावर २६ जणांना लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्याधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी अद्यापही याबाबत खुलासा केला नसल्याचे डॉ. गावंडे यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणाचे गूढ अद्याप वाढले असल्याचे दिसत आहे.