औरंगाबाद : शहरातील रस्त्यांवर तब्बल ७०२ रिक्षा विनापरवानाच धावत असल्याची बाब समोर आली आहे. तब्बल वर्षभरापासून रिक्षाचालक आरटीओ कार्यालयाला गुंगारा देत आहेत. त्यामुळे ७० लाख रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले जात आहे.
वर्षभरापूर्वी आरटीओ कार्यालयात परवान्यांसाठी ७०२ मालकांनी इरादापत्रांवर नवीन रिक्षांची खरेदी केली; परंतु इरादापत्रावर रिक्षा खरेदी केल्यानंतर परवाना काढण्याकडे दुर्लक्ष केले. एका परवान्यासाठी १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येते; परंतु परवाना न घेताच रिक्षा चालविण्यात येत असल्याने ७० लाख रुपयांचा महसूल बुडत आहे. या रिक्षांची आरटीओ कार्यालयात फक्त नोंदणी झाली आहे. सध्या खाजगी रिक्षांना परवानगी नाही. त्यामुळे या रिक्षांना परवाना घेणे बंधनकारक आहे. सातशे रिक्षांच्या या गोंधळानंतर गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून रिक्षांच्या नोंदणीच्या वेळीच परवाना शुल्क आकारण्यात येत असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अवैध वाहतूक बंद करारिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघाने सोमवारी पत्रकार परिषदेत विनापरवाना धावणाºया रिक्षांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निसार अहमद खान, कोषाध्यक्ष कैलास शिंदे, कार्याध्यक्ष एस. के. खलील, सरचिटणीस रमाकांत जोशी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शहर बस ही सीएनजी अथवा बॅटरीवर चालणारी असावी, अशीही मागणी केली.
कारवाई करणाररिक्षाचालक संघटनांच्या माध्यमातून संबंधित रिक्षाचालकांनी परवाना घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सध्या रिक्षाचालकांना परवाना घेण्यासाठी संधी दिली जात आहे. त्यानंतर मात्र या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल.- संजय मेत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी