करमाड/छत्रपती संभाजीनगर: आज संध्याकाळी करमाड, शेंद्रा परिसरात व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पूर्व परिसरातील जवळपास सर्वच भागात ३० मिनिट अवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी पिकांमधील काढणीला आलेला गहू, ज्वारी, हरबरा यांचे अतोनात नुकसान झाले. तसेच द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आशा फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याशिवाय आंब्याचा मोहर देखील गळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शहराला देखील अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने नागरिकांना तारांबळ उडाली.
लग्न समारंभात उडली दानादानआज शुभ मुहूर्त असल्याने अनेक मंगल कार्यालय विवासाठी बुक होते. संध्याकाळी लग्नाचे तिथी असल्याने अनेक गावात देखील लग्न समारंभ आयोजित केलेले होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले. यामुळे जय्यत तयारी असलेल्या लग्न समारंभात दाणादाण उडाली. अन्नदानाचा खर्च यामुळे वाया गेला. पार्किंगसाठी ज्यांनी शेतात व्यवस्था केली होती त्या ठिकाणी लावलेल्या गाड्या चिखलामुळे बाहेर काढताना वाहनधारकांना त्रास झाला.
छत्रपती संभाजीनगरातही पाऊस आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील वातावरण बदलले. जोरदार वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या जलधारा शहर व परिसरात बसल्या. ऊन सावल्यांचा खेळ असे काही चित्र वातावरणात होते. दुपारी बारा ते चार वाजेच्या दरम्यान घामाच्या धारा आणि सायंकाळी जलधारा असा हवामानातील बदल शहरवासीयांनी अनुभवला.