सोयगाव तालुक्यातील ८४ गावांना अवकाळीचा फटका
कृषी-महसूल विभागाच्या पथकाची संयुक्त पाहणी सुरू
सोयगाव : तालुक्यातील ८४ महसुली गावांना अवकाळी आणि गारपीट, वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. रब्बीची काढणी पट्ट्यातील पिके आडवी झाली आहेत. या नुकसानीची कृषी आणि महसूल विभागाकडून सोमवारपासून तातडीने पाहणी सुरू झाली आहे, असे तालुका कृषी अधिकारी संगीता पवार यांनी सांगितले.
सोयगाव तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले. ८४ महसुली गावांतील रब्बीच्या क्षेत्राला या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासाठी तातडीने तालुका कृषी विभाग आणि महसूल यांच्याकडून संयुक्त पाहणी सुरू करण्यात आली आहे.
तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिलेल्या आदेशावरून तलाठी आणि मंडल अधिकारी यांची संयुक्त पथके नुकसानग्रस्त भागात पाहणी करून अहवाल तातडीने तहसील कार्यालयाला सादर करणार आहेत. नुकसानीच्या क्षेत्राची आकडेवारी अद्यापही हाती आली नसली तरी, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे.
--
तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यात रब्बीच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून, तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची माहिती आणि प्राथमिक आकडेवारी सादर करण्यासाठी तलाठी आणि कृषी सहायकांना आदेशित करण्यात आले आहे. सोमवारपासून संयुक्त नुकसानीची पाहणी हाती घेण्यात आली आहे. अहवालनिहाय माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात येईल.
- प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव.
---
छायाचित्र ओळ :
सोयगाव तालुक्यात अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसानीची पाहणी करताना तालुका कृषी अधिकारी संगीता पवार, कृषी मंडल अधिकारी संपत वाघ.