औरंगाबाद : मागील १० वर्षांमध्ये नवीन प्रतिजैविके बनलेली नाहीत आणि आगामी २० वर्षेही नव्या प्रतिजैविकांची निर्मिती अशक्य आहे. त्यामुळे उपलब्ध प्रतिजैविकांचा वापर योग्यवेळी आणि योग्य प्रमाणातच करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी व्यक्त केले.
शहरात रविवारी ‘अॅन्टिमायक्रोबियल स्टिवरशिप’ यासंदर्भात कार्यशाळा झाली. यानिमित्त कमलनयन बजाज रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आलोक श्रीवास्तव, डॉ. श्रीकांत सहस्त्रबुद्धे, मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयाचे संचालक डॉ. राहुल पंडित, डॉ. कपिल झिरपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा डॉ. श्रीवास्तव म्हणाले, १९४२ मध्ये प्रतिजैविकांचा शोध लागला. प्रतिजैविकांमुळे आजारांतून बाहेर पडण्यासाठी मोठे पाऊल पडले; परंतु सततच्या आणि अतिवापरामुळे अनेक आजारांमध्ये प्रतिजैविकांचा परिणाम दिसून येत नाही. जीवाणूंच्या संरचनेत बदल झाला आहे. तुलनेत नव्या प्रतिजैविकांची निर्मिती झालेली नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन अमेरिकेत २००९ मध्येच प्रतिजैविकांच्या वापरासंदर्भात जनजागृती सुरू झाली. अशीच जागृती भारतातही होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, बाह्यरुग्ण विभाग ते ‘आयसीयू’ अशा सर्व ठिकाणी रुग्णांना प्रतिजैविके दिली जातात. तेव्हा ती देणे गरजेचे आहे का, याचा विचार करून योग्य प्रमाणात प्रतिजैविके दिली पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नयेत; परंतु औषधी दुकानांमध्ये जाऊन सर्रास प्रतिजैविके घेतली जातात. ते थांबले पाहिजे. त्यासाठी डॉक्टर, फार्मासिस्ट आणि नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. डॉ. पंडित म्हणाले, प्रतिजैविकांच्या योग्य वापरासाठी मराठवाड्यात प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आता पुढाकार घेतला आहे.
प्रिस्क्रिप्शनची बंधने पाळावीतशासनाने डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर काही बंधने आणली आहेत. औषधी लिहिताना दिनांक, औषधी घेण्याचा कालावधी हे बंधनकारक केले आहे. औषधी दुकानांवर जुन्या प्रिस्क्रिप्शनवर औषधी देता कामा नये. प्रतिजैविकांच्या नियंत्रित वापरासाठी या बंधनांचे पालन महत्त्वपूर्ण ठरेल, असे डॉ. झिरपे यांनी सांगितले.