औरंगाबाद : महापालिका निवडणुकीचा बिगुल अखेर रविवारी वाजला. राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला पत्र पाठवून प्रभाग निवडणुकीसाठी लोकसंख्येची पडताळणी, प्रभाग रचनेचे प्रारूप प्रस्ताव अंतिम करून २७ नोव्हेंबरपर्यंत सविस्तर अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाच्या पत्राची मनपात आतुरतेने वाट पाहण्यात येत होती. शनिवारी सायंकाळी महापालिकेला हे पत्र प्राप्त झाले. अवघ्या २४ दिवसांमध्ये मनपा प्रशासनाला लोकसंख्येसह प्रभागाचे विवरण आयोगाला सादर करावे लागणार आहे. शहरात ११५ वॉर्डांसाठी एकूण २९ प्रभाग राहणार आहेत. चार वॉर्डांचा एक प्रभाग करण्यात येणार आहे. शेवटचा ३ वॉर्डांचा एक स्वतंत्र प्रभाग राहील.
औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय मंडळींसह सर्वसामान्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने घेण्यात येत होती. प्रभाग पद्धतीत चार वॉर्ड एकत्र करून निवडणूक घेण्यात येणार आहे. मतदारांना आपल्या प्रभागातून चार नगरसेवकांना निवडण्याची संधी आहे. पहिल्यांदाच एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून येतील. प्रभागात चार वॉर्डही ठेवण्याची तरतूद राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने महापालिकेला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रारूप प्रभाग रचनेचे प्रस्ताव २१ नोव्हेंबरपर्यंत मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या समितीसमोर सादर करावेत. समितीच्या मान्यतेनंतर २७ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल निवडणूक आयोगाला सादर करावा. आयोगाचे सचिव किरण कुरंदकर यांची पत्रावर सही आहे. या पत्रासोबत आयोगाने वॉर्डांच्या आरक्षणाची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.
महापालिकेची अगोदरच पूर्वतयारीराज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही क्षणी पत्र येईल, याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाला होती. त्यादृष्टीने मनपा प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवातही केली होती. २०१५ मध्ये ११३ वॉर्डांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यानंतर सातारा-देवळाईचा मनपात समावेश झाला. तेथेही दोन वॉर्ड तयार करून नंतर पोटनिवडणूक घेण्यात आली. एकूण ११५ वॉर्ड मनपाच्या दप्तरी आहेत. अहमदनगर महापालिकेने अलीकडेच प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतली आहे. या निवडणुकीची माहितीही अगोदरच मनपाने घेवून ठेवली होती.
चक्रानुक्रमे आरक्षण फिरणार२०१६ मध्ये राज्य निवडणूक आयोगाने प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करण्यासाठी चक्रानुक्रमे पद्धत कशी राबवावी, याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशानुसार एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत वॉर्डांचे आरक्षण चक्रानुक्रम पद्धतीने फिरविण्यात येईल. मागील निवडणुकीत आरक्षित झालेले वॉर्ड आता चक्रानुक्रमे पद्धतीमधून बाहेर येतील. सध्या खुले असलेल्या वॉर्डांवर आरक्षण येण्याची दाट शक्यता आहे. आयोगाच्या या पद्धतीमुळे अनेक राजकीय मंडळींच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार आहे.
राजकीय मंडळींना भरली धडकीआरक्षणासाठी डिसेंबर २०१९ अखेर ड्रॉ पद्धतीचा अवलंब करण्यात येईल. आरक्षणात कोणताही वॉर्ड आरक्षित होऊ शकतो. आरक्षण पद्धतीनंतरच राजकीय मंडळींचे भवितव्य निश्चित होणार आहे. आरक्षणाच्या भीतीने राजकीय मंडळींना चांगलीच धडकी भरली आहे. आयोगाकडून ड्रॉ पद्धतीला विलंब झाल्यास जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ड्रॉ पद्धत घेण्यात येईल.
२०११ ची जनगनणा 12,20,832 : एकूण लोकसंख्या 2,28,105 : अनुसूचित जातीचे मतदार 16,320 : अनुसूचित जमातीचे मतदार