लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : २०१९ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांची मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरू केली आहे. उपनेते आ. प्रा. तानाजी सावंत यांच्या खांद्यावर आता सोलापूरसह उस्मानाबादच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी टाकल्याने आगामी काळात होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकाही प्रा. सावंत यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना लढणार असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.मागील काही महिन्यांपासून शिवसेना अंतर्गत गटबाजीच्या राजकारणाने पोखरून गेलेली आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी सावंत यांच्याकडे सुत्रे सोपविली; मात्र पक्ष वाढविण्यासाठी घेतलेला हा निर्णय शिवसैनिकांनीच उधळून लावल्याचे मागील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून आले होते. त्यानंतर जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा कोणाकडे राहणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शिवसेना पक्षश्रेष्ठींनी सावंत यांच्याकडे जिल्हा संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपवून जिल्हा शिवसेना सावंत यांच्याच नेतृत्वाखाली कार्यरत राहील, असा संदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेनेची नव्याने पुनर्बांधणी करण्याचे आव्हान प्रा. सावंत यांच्यासमोर आहे. आ. प्रा. सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने पालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढल्या. मात्र या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. ऐन निवडणूक काळात सेनेच्याच अनेकांनी बंडाचा झेंडा उगारल्याने अपयश पदरी पडले. उस्मानाबाद पालिकेत शिवसेना नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी झाला असला तरी या विजयामध्ये शिवसेनेपेक्षा मकरंद राजेनिंबाळकर यांची वैयक्तिक प्रतिमाच अधिक सरस ठरल्याचे विरोधकही मान्य करतात. पालिका निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला दारूण पराभव पत्करावा लागला. या दोन्ही पराभवानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे पुढे काय? असा प्रश्न उभा ठाकला असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा सावंत यांच्या नेतृत्वावरच विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी दीड-दोन वर्षांच्या उरलेल्या कालावधीत शिवसेनेचे गावपातळीपासून जिल्हा स्तरापर्यंतचे नेटवर्क नव्याने मजबूत करण्याचे आवाहन सावंत यांच्यापुढे उभे आहे.
सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली आगामी निवडणुका...
By admin | Published: May 18, 2017 12:01 AM