छत्रपती संभाजीनगर : नरेंद्र मोदी यांच्यासोबत ताठ मानेने बसणारा, ३७० ला पाठिंबा देणारा, राम मंदिराला जाहीर पाठिंबा असणारा खासदार निवडून द्या व मराठवाड्यातून नव्या निजामाला उखडून फेका, असे जळजळीत आवाहन मंगळवारी येथे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले. हे आवाहन करताना, त्यांनी जाहीर सभेतील प्रत्येकाकडून हे असे करणार का, असे वदवूनही घेतले. त्यांना होकारार्थी प्रतिसादही मिळाला.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उपस्थित प्रचंड जनसमुदायाला साक्षी ठेवून अमित शाह यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळच फोडला. काँग्रेसचा एकूण सत्ताकाळ आणि मोदी सरकारची दहा वर्षे अशी तुलना होऊच शकत नाही, एवढी कामे मोदींनी केली असल्याचा दावा शाह यांनी केला. आपण कुणाच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत, याची उध्दव ठाकरे यांना लाज वाटली पाहिजे, असा घणाघात केला.
या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे, रिपाइं आठवले गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, आदींची भाषणे झाली. फडणवीस यांनी या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर अमित शाह यांच्या सहीने झाले, हे सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. सभेचे सूत्रसंचालन शहर भाजपचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी केले. आभार संजय केणेकर यांनी मानले.
स्वामी रामानंद तीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांचा आवर्जून उल्लेखअमित शाह यांनी ८ वाजून २ मिनिटांनी भाषण सुरू केले आणि ८ वाजून २४ मिनिटांनी संपवले. त्यात त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. सुरुवातीलाच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्यासह मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांचा आवर्जून उल्लेख केला.
विकासाचा बायोडाटा पाहूनच करा मतदानदेशाच्या स्वाभिमानाची पायाभरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी रचल्याचे सांगून,शाह यांनी शिवाजी महाराजांना प्रणाम करीत, तरुणाईला भावनिक साद घातली. आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे, तर देशासाठी आहे. त्यामुळे तरुणाई ताकदीने पुढे येऊन, प्रत्येकाने केलेल्या विकासाचा बायोडाटा पाहूनच मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पुन्हा राहुलयान लाँच केलेएकीकडे 'आत्मनिर्भर भारत' बनविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांचे व्हिजन ठेवले आहे. देशाची अर्थव्यवस्था २०३० मध्ये तिसऱ्या स्थानी आणण्याची आणि २०४७ मध्ये चंद्रावर माणूस पाठविण्यासाठी त्यांनी वज्रमुठ बांधली आहे. दुसरीकडे सोनिया गांधींनी घराणेशाहीला जप्त पुन्हा राहुलयान लाँच केले आहे, अशी बोचरी टीकाही शाह यांनी केली.
जागा नेमकी कुणाची?छत्रपती संभाजीनगरची महायुतीतून नेमकी जागा कुणाची; हे सभेतून स्पष्ट झाले नाही. भाजप की शिंदे गट; हा संभ्रम दूर झाला नाही. शिंदे गटाचे आमदार अधिक असल्याने त्यांनी आपला दावा सोडला नाही. पण, या जागेवर भाजपने दावा केला असला तरी तशी वाच्यता या सभेत न झाल्याने उत्सुकता ताणली गेली आहे.