छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भारतीय माहिती सेवा (आयआयएस) परीक्षेत छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीतील कार्यक्रम आधिकारी नम्रता फलके यांनी देशात २० वा, तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे.
नम्रता फलके या वर्धा जिल्ह्यातील देवळी गावच्या रहिवासी आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण वर्धा येथील शाळेत झाले. त्यांनी पुणे विद्यापीठातून भूगोल विषयात गोल्ड मेडल पटकावले. त्यांनी एमए लोकप्रशासन, वृत्तपत्रविद्या विषयात पदव्युत्तरचे शिक्षण घेतले. स्टाफ सलेक्शन परीक्षेत आठ वर्षांपूर्वी ऑल इंडिया ८४ क्रमांक पटकावला, तर राज्यातून प्रथम येत आकाशवाणीत कार्यक्रमाधिकारी पद मिळवले होते.
यूपीएससीतर्फे घेण्यात आलेल्या आयआयएससाठीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यातही नम्रता फलके यांनी राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला, तर देशात २० क्रमांक पटकावला आहे. देशभरातून २९ जणांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. नम्रता फलके यांनी बालकांच्या लसीकरणाची आकाशवाणीवरून जनजागृती केल्याबद्दल २०१७ व २०१९ साली युनिसेफने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले आहे, तर २०२० साली भारत सरकारचा पहिला योगा सन्मानही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. या निवडीबद्दल त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना आनंद व्यक्त केला. या निवडीमुळे अधिक काम करण्याची संधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.