- राम शिनगारे
तुमचा शैक्षणिक प्रवास कसा आहे? औरंगाबाद महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात वडील पंपचालक, तर आई मनपा शाळेत प्राथमिक शिक्षिका. महाराष्ट्र पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनमधून पदविका पूर्ण केली. एमआयटीतून अभियांत्रिकीची पदवी घेऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईतील ‘व्हीजेटीआय’मध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी शिक्षण घेत असताना ही छोटी फिल्ड आहे, आपण मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत, असे वाटू लागले. यातूनच यूपीएससीची तयारी सुरू केली.
परीक्षेची तयारी कशी केली? यूपीएससीचा अभ्यासक्रम अनेकवेळा वाचून घेतला. मागच्या वेळी प्रश्न कोणत्या प्रकारचे आले. त्यानुसार पूर्व परीक्षेचे प्रश्न सोडविण्याचा सराव केला. प्रत्येक विषयाची चांगली पुस्तके जमा केली. त्यानंतर परीक्षेत विचारण्यात येणाऱ्या प्रश्नानुसार तयारी केली. प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सर्वाधिक सराव केला. मुख्य परीक्षेसाठी सविस्तर उत्तरे लिहावी लागतात. तसे प्रश्न सोडविण्यासाठी मॅप, डायग्राम, फ्लो चार्ट आदींचा वापर केला.
पहिल्या प्रयत्नात यश मिळाले का? नाही. २०१५ मध्ये पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात पूर्व परीक्षेत नापास झालो. २०१६ मध्ये पूर्व पास झालो; मात्र मुख्य नापास झालो. २०१७ मध्ये पूर्व, मुख्य उत्तीर्ण झालो. पण मुलाखतीत नापास झालो. २०१८ मध्ये या अनुभवाचा फायदा झाला. यातून मोठे बदल केले. व्यक्तिमत्त्व बदलले. त्यामुळे मुलाखतीत यश मिळवून देशात १५५ वा क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?आपल्याकडे विद्यार्थी फुल टाईमपास करतात. त्या विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. जी आवड आहे, त्यात छंद जोपासला पाहिजे. खेळ खेळावेत. यातून प्रखर आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविले पाहिजे. सतत फिरून समाजाचा अनुभव धेतला पाहिजे. आवड जोपासावी. त्यातून चांगले करिअर घडविले पाहिजे. त्यासाठी योग्य मार्गदर्शन, मेहनत आणि चिकाटी असली पाहिजे.
परदेशी सेवांमध्ये काम करण्याची आवड आहे. या सेवेतून देशाच्या निर्णय प्रक्रियेत, धोरण निश्चितीमध्ये सहभागी होता येईल. ही सन्मानाची , अभिमानाची बाब आहे. - आदित्य मिरखेलकर