औरंगाबाद : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी महापालिका मुख्यालयातील सभागृहात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर शिंदे शहरासाठी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका प्रशासन विविध मागण्या त्यांच्यासमोर ठेवणार आहे.
आकृतिबंधाची घोषणा होण्याची शक्यतामहापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे अनेक वर्षांपासून आकृतिबंध प्रलंबित आहे. आकृतिबंधास अंतिम मंजुरीची घोषणा शिंदे यांच्याकडून होण्याची शक्यता आहे.
सातारा-देवळाईचा सर्वांगीण विकासचार वर्षांपूर्वी महापालिकेत सातारा-देवळाई परिसराचा समावेश करण्यात आला. या भागातील सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून पाहिजे तशी रक्कम देण्यात आली नाही. या भागात रस्ते आणि ड्रेनेज यंत्रणा आदी कामांसाठी ३७५ कोटी रुपयांची मागणी मनपाकडून करण्यात येणार आहे. यातील किती रक्कम मिळेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्मार्ट सिटीच्या सीईओंचा प्रश्नस्मार्ट सिटीत मागील सहा वर्षांपासून महापालिका आयुक्त सीईओ म्हणून काम पाहत आहेत. नगरविकास विभागाने अचानक सीईओपदी आणखी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. पदसिद्ध सीईओ पदावर आयुक्तांशिवाय अन्य अधिकारी कसे काय काम करू शकतात, हा वाद शासनदरबारी सुद्धा पोहोचला आहे. सीईओ पदासंदर्भात शनिवारी एकनाथ शिंदे यांच्याकडून काही घोषणा होण्याची शक्यता आहे.
महापालिकेला आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यतास्मार्ट सिटी योजनेत महापालिकेला आपला वाटा म्हणून २५० कोटी रुपये टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे १४८ कोटींच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी २४ कोटी रुपये द्यायचे आहेत. यातील काही रक्कम राज्य शासन देईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.