धारुर: येथील सराय मीर आलम व मस्जिद या ठिकाणी भरणारी उर्दू मिलिया शाळा स्थानिक मस्जिद कमिटी व संस्थेच्या वादात आठ दिवसापासून उघड्यावर भरत आहे. विद्यार्थ्यांनाही उघड्यावरच बसण्याची वेळ आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून हा वाद प्रशासन मिटवणार का? असा प्रश्न सर्वसामान्य मुस्लिम पालकांमधून केला जात आहे.धारुर शहरात एकमेव असणारी मिलिया उर्दू शाळा १९६८ पासून सराय मिर आलम व मस्जिद या जागेत आहे. ही शाळा पहिली ते दहावी पर्यंत असून या शाळेत ११०० विद्यार्थी आहेत. वक्फबोर्डाकडून करारावर या संस्थेला शाळेसाठी ही जागा देण्यात आलेली आहे. दोन वर्षापूर्वी संस्थेने बांधकामासाठी शाळेची एक बाजू पाडण्यात आली. दुसऱ्या बाजूच्या खोल्यात शाळा भरवली जाऊ लागली. या बांधकामास मस्जिदच्या स्थानिक व्यवस्थापन समितीने विरोध केला. यावर वक्फबोर्डाकडे हरकत घेतली. त्यावर बांधकामास वक्फ बोर्डाने जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे हे बांधकाम त्यावेळीपासून बंद आहे.या ठिकाणाला तत्कालीन जिल्हाधिकारी सुनिल केंद्रेकर यांनी भेट देऊन पाहणी केली होती. संस्था व मस्जिद स्थानिक कमिटी यांच्यातील वाद अद्यापपर्यंत न मिटल्यामुळे यावर्षी एका बाजूला भरणाऱ्या शाळेच्या जागेत १५ जूनच्या रात्री अज्ञात व्यक्तींनी शाळा भरणाऱ्या ठिकाणी भंगार साहित्य टाकले. यामुळे आठ दिवसापासून १६ जूनपासून ही शाळा उघड्यावर भरत असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. संस्था व स्थानिक मस्जिद कमिटी यांच्या वादामध्ये विद्यार्थ्यांचे मात्र हाल होत आहेत. यावादाकडे प्रशासन लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य पालकामधून होत आहे.धार्मिक ठिकाणी शाळा चालवणे योग्य नाही - सादेक इनामदारधार्मिक स्थळाच्या ठिकाणी शाळा असणे योग्य नाही. शाळेच्या गोंगाटाचा त्रास या धार्मिक स्थळी येणाऱ्यांना होतो. शाळेसाठी शहरात संस्थेला जागाही घेऊन देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र संस्थेचा हट्ट याच जागेचा का ? हे माहित नाही, अशी प्रतिक्रिया मस्जिद स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सादेक इनामदार यांनी सांगितले.प्रशासनाचा पुढाकार हवा - शेख महंमद शरीफस्थानिक मस्जिद कमिटी व संस्था यांचा वाद काही असो, विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागणे योग्य नाही. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नात लक्ष घालून तात्काळ विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी प्रतिक्रिया नगरसेवक महमंद शरीफ यांनी व्यक्त केली.संस्थेकडे तीस वर्षाचा करार - मुख्याध्यापक सय्यद हारुणया जागेचा संस्थेकडे तीस वर्षाचा करार असून १५ जून रोजी अज्ञात व्यक्तींनी शाळेचे साहित्य बाहेर टाकले. त्यामुळे विद्यार्थ्यांना उघड्यावर बसावे लागले आहे. साहित्य बाहेर टाकल्याप्रकरणी पोलिस ठाण्याला तक्रारही दिली असल्याचे मुख्याध्यापक सय्यद हारुण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
उर्दू शाळा भरतेय उघड्यावर
By admin | Published: June 25, 2014 11:52 PM