शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणीच पाणी
औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधारी, विरोधी पक्षातील नगरसेवकांनी मागील दहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात सिमेंटचे रस्ते तयार केले. गुळगुळीत रस्त्यांमुळे नागरिक खूष होतील, पुढील पंचवार्षिकमध्ये आपणच निवडून येऊ, हा समज राजकारण्यांचा होता. सिमेंट रस्त्यांचे दुष्परिणाम आता नागरिकांना जाणवू लागले आहेत. अनेक सिमेंट रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही.
शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे व्हावेत म्हणून महाराष्ट्र शासनाने महापालिकेला सर्वप्रथम २४ कोटी रुपये दिले. त्यानंतर १०० कोटींचा निधी दिला. दीड वर्षांपूर्वी शासनाने पुन्हा १५० कोटी दिले. या शिवाय महापालिकेने आपल्या निधीतून शहरातील ११५ वॉर्डांमध्ये दहा वर्षात सिमेंटचे रस्ते मोठ्या प्रमाणात केले. जवळपास ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च करून हे रस्ते तयार केले आहेत. मात्र, सिमेंट रस्ते तयार करताना नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जाईल, रस्त्यावर अथवा बाजूला पावसाचे पाणी साचून राहिल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. दिसला रस्ता की टाकले सिमेंट अशा पद्धतीचे धोरण होते. शहरातील अनेक वसाहतींमध्ये रस्ता उंच, तर घर खाली गेले. सिडको एन-४ भागात तर बहुतांश रस्त्यांवर पाणी साचत आहे. पाण्याचा निचरा अजिबात होत नाही. नागरिकांना पावसाच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागते. साचलेल्या पाण्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढतो. राजकीय मंडळींनी मागील काही वर्षांमध्ये अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे प्रशासनाने आता नवीन रस्त्यांची कामेच बंद केली आहेत.