औरंगाबाद : अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (जीएसपी) तोडली असून, विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. त्याचा फटका औरंगाबादेतील निर्यातक्षम फार्मा उद्योगांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे विशेष व्यापारी सूट दर्जा काढून घेण्याचे धोरण दोन महिन्यांनंतर लागू होणार असल्यामुळे केंद्रीय वाणिज्य विभाग याबाबत काय निर्णय घेतो याकडे उद्योजकांचे लक्ष लागले आहे.
औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमध्ये युएस बेस (अमेरिकास्थित) असलेल्या औषधी उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यांचे १०० टक्के उत्पादन युएसमध्ये निर्यात होते. तिकडील परवानग्या, प्रदूषण नियंत्रण मंडळ एनओसीची किचकट प्रक्रिया पाहता ते उद्योग भारतात कमी खर्चात उत्पादन करून निर्यात करीत आहेत. अमेरिकेच्या जीएसपी तोडण्याच्या धोरणाचा फटका या उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सिनेटमध्ये जीएसपीबाबत माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतातील फार्मा उद्योगांवर होणार आहे. जीएसपीअंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती. अमेरिकेच्या जीएसपी योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता.
अलीकडच्या काळात औरंगाबादमध्ये फार्मा उद्योग वाढीस लागला आहे. जीएसटीमुळे उत्पादन शुल्कात सवलत मिळू लागली आहे. मराठवाडा विभागात लहान-मोठे १६२ च्या आसपास परवाना असलेले फार्मा उद्योग आहेत. औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत ४० च्या आसपास एमएसएमईअंतर्गत येणारे फार्मा उद्योग आहेत. लघु उद्योग कंपन्या जीएसटीनंतर प्रगतिपथावर आहेत. येथून बाहेर गेलेल उद्योग पुन्हा इकडे येत आहेत.
परिणाम सांगणे अवघडऔरंगाबादमध्ये सर्व मिळून १०० च्या आसपास उद्योग आहेत. अमेरिकास्थित मोठ्या कंपन्या वाळूजमध्ये आहेत. त्यांचे उत्पादन निर्यात होते. त्या कंपन्यांवर अमेरिकेच्या निर्णयाचा परिणाम कसा होईल, हे आताच सांगणे अवघड आहे. त्या कंपन्यांना येथे उत्पादन करणे सोपे जाते. उत्पादन खर्च कमी असल्यामुळे त्या कंपन्या येथे आहेत. त्या कंपन्यांचे १०० टक्के उत्पादन अमेरिकेत निर्यात केले जाते. असे फार्मा उद्योजक आनंद नागापूरकर यांनी सांगितले.
सीआयआय उपाध्यक्षांचे मत असेसीआयआयचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले की, येथून मोठ्या प्रमाणात फार्मा उत्पादने अमेरिकेत निर्यात होतात. जर बदललेल्या निर्णयाच्या परिघात औषधी उत्पादने येणार असतील, तर औरंगाबादच्या उद्योगांवर परिणाम होईल. अमेरिकेने स्थानिक उद्योगांना चालना देण्यासाठी चीन, युरोपियन कंपन्यांच्या उत्पादनावर आयात शुल्क वाढविले आहे. भारतीय वाणिज्य विभागाने यामध्ये २ महिन्यांच्या अवधीत निर्णय घेतला तर औरंगाबादच्या उद्योगांना दिलासा मिळेल.