लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र निकम यांनी चक्क अंबर दिवा असलेल्या वाहनाचा वापर केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. या प्रकरणी तक्रार आणि छायाचित्र प्राप्त झाल्यानंतर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी अहवाल प्राप्त होताच नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.सर्वोच्च न्यायालयाने व्हीआयपी कल्चर संपविण्यासाठी मंत्री आणि अधिका-यांना अंबर दिवा वापरण्यास मनाई केली. त्यामुळे आता महानगरपालिकेत महापौर आणि आयुक्तांनाही अंबर दिवा राहिलेला नाही. तरीही मनपातील उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडून मात्र अंबर दिव्याचे वाहन वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे. सध्या मनपात केवळ अग्निशमन विभागाच्या वाहनावरच अंबर दिवा आहे. निकम यांनी हेच वाहन अंबर दिवा उघडा ठेवून वापरल्याची तक्रार आणि छायाचित्र मनपा आयुक्तांना प्राप्त झाले. त्यानंतर मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. उपायुक्त अय्युब खान यांच्याकडे चौकशी सोपविण्यात आली असून, लवकरात लवकर त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे उपायुक्त रवींद्र निकम अडचणीत आले आहेत.
मनपा उपायुक्तांकडून अंबर दिव्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:32 AM