औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२२ मध्ये मौलाना आझाद काॅलेजच्या परीक्षा केंद्रावर सकाळी पहिला पेपर सुरू असतांना उमेदवाराकडे ब्लूटूथ इयरफोन आढळून आला. त्या उमेदवाराविरोधात केंद्रप्रमुखाच्या तक्रारीवरून सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
प्रा. डाॅ. सय्यद अथरोद्दीन मैनोद्दीन कादरी हे मौलाना आझाद कॉलेजच्या एमपीएससी परीक्षेचे केंद्रप्रमुख आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा -२०२२ चा पहिला पेपर आज सकाळी ९ वाजता होता. त्यासाठी विद्यार्थ्यांना फ्रिस्क्रिन एजन्सीने तपासुन परीक्षा केंद्रात सोडले. मोबाईल फोनसह अन्य दुरसंचार साधने परीक्षा केंद्रात घेवून जाणे, बाळगणे मनाई आहे. सर्व हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.
दरम्यान, परीक्षेला सुरूवात झाल्यानंतर १०.५० वाजता. केंद्रप्रमुख प्रा. डाॅ. सय्यद कादरी व जिल्हाधिकारी कार्यालयाचे निरीक्षक रूपेश शिंगारे हे खोली क्रमांक ४ मध्ये राऊंड घेत होते. त्यावेळी सचिन नवनाथ बागलाने या उमेदवाराकडे ब्ल्यू टूथ इअरफोन असल्याचे पथकाला आढळून आले. या गैरप्रकाराची एमपीएससीने गंभीर दखल घेतली. परीक्षेदरम्यान ब्लूटूथचा वापर करणाऱ्या उमेदवाराविरुद्ध गैरप्रकारास प्रतिबंध अधिनीयम १९८२ अन्वये कलम ७ अन्वये सिटीचौक पोलिस ठाण्यात केंद्र प्रमुखांनी तक्रार दिली.
३७ उमेदवारांची गैरहजेरीराज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ शहरात ४ केंद्रांवर २१ ते २३ जानेवारीदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ९ ते १२, दुपारी ४ ते ५ शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात ४३२ पैकी ४२०, मौलाना आझाद महाविद्यालयात २८८ पैकी २७५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य महाविद्यालयात २४० पैकी २३६ तर मिलिंद कला महाविद्यालयात २२२ पैकी २१४ उमेदवारांची उपस्थिती होती. ११८२ पैकी ११४५ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर ३७ विद्यार्थ्यांची गैरहजेरी होती.
ट्विटर हॅण्डलवरून दिली माहीतीराज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ करिता औरंगाबाद येथे परीक्षेच्या वेळी ब्लू टूथ जवळ बाळगल्याबद्दल सचिन नवनाथ बागलाने या उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहीती एमपीएससीच्या ट्विटर हॅण्डलवरूनही देण्यात आली.