छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात कुठेही व्हीआयपी दौरा, तणावाच्या परिस्थितीत विनापरवाना ड्रोन आढळल्यास आता जिल्हा पोलिस ते थेट हवेतून ताब्यात घेतील. दीड वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना मूर्त रूप मिळाले असून, शुक्रवारी या 'अँटी ड्रोन गन'चा प्रयोग यशस्वी ठरला. शिवाय, अद्ययावत एचडी स्पिकर असलेले सात कॅमेरा ड्रोनदेखील विभागाला प्राप्त झाले.
पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर या अद्ययावत तंत्रज्ञानाची चाचपणी करण्यात आली. तत्कालीन पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी या गनसाठी प्रयत्न केले होते. पुण्यातील पोलिस तंत्रज्ञान वायरलेस विभागाकडून याला मान्यता प्राप्त झाल्यानंतर एप्रिल महिन्यात चाचपणी झाली होती.
अँटी ड्रोन गन म्हणजे नेमके काय ?अनेक जण संवेदनशील ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडवतात. अतिमहत्त्वाची व्यक्ती, सभा, दौऱ्यातही अनोळखी ड्रोन आढळल्यास सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडते. अशा वेळी अँटी गन ड्रोनद्वारे हवेत उडणाऱ्या संशयास्पद ड्रोनकडे या निशाणा साधून आवश्यक गिगाहर्ट्झच्या शूटने त्यावर नियंत्रण मिळवता येते.
असे आहे तंत्रज्ञान: -जिल्हा पोलिसांना प्राप्त गनद्वारे २ ते ३ किमी अंतरावरील ड्रोनवर कारवाई शक्य.-१.८, २.८ व ५.८ गिगाहर्ट्झ अशा तीन फ्रिक्वेन्सीचा यात समावेश.-हवेतील ड्रोनच्या दिशेने ५.८ गिगाहर्ट्झ शूट केल्यावर ड्रोनच्या मूळ कंट्रोलशी (आरसी) संपर्क तुटून रिटर्न टू होम म्हणजेच जेथून उडवले, तेथे पोहोचेल.-२.८ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीद्वारे ड्राेनचा संपर्क बंद होऊन आहे तेथेच लँड होईल. धोकासदृश परिस्थितीत ड्रोन थेट ताब्यात घ्यायचा असल्यावर या फ्रिक्वेन्सीचा वापर होतो.-५.८ वरून थेट १.८ गिगाहर्ट्झवर शूट केल्यावर ड्रोन जॅम होऊन हवेतच तरंगत राहील.-सदर गन वापरत असलेल्या १ ते १.५ किमी परिसरातील ब्ल्यूटूथ, इंटरनेटही बंद पडते. या गनला ४५ मिनिटांचे बॅटरी बॅक आहे.
ड्रोनद्वारेच जमावाला सूचनाजिल्हा पोलिसांना ७ अद्ययावत ड्रोन प्राप्त झाले आहे. ३६० डिग्री सेन्सर असलेले हे ड्रोन हवेत तीन मीटरच्या रेडियसमध्ये अडचण (उदा. पक्षी, इमारत) आल्यास स्वत:हून थांबते. जवळपास ३ ते ६ किलोमीटरवर आणि १५ किमी दूर जाऊन शकतील. याला प्रामुख्याने तीन लेन्स असून, टेलिफोटोची २५ मेगापिक्सेल, ४ के व्हिडीओसाठी १२ मेगापिक्सेल व थर्मल लेन्स ६४० पिक्सेलची आहे. थर्मल लेन्सद्वारे अंधारातदेखील स्पष्ट चित्रीकरण येईल.