लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिकेच्या निवडणुकीत २० पैकी एका प्रभागात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार असून यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. राज्यात पहिल्यांदाच निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार असून याद्वारे ईव्हीएम संदर्भातील आरोप दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे.इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन अर्थात ईव्हीएमसंदर्भात देशभरात शंका घेतली जात होती. ज्या-ज्या ठिकाणी सत्ता आली त्या ठिकाणी विरोधकांकडून थेटपणे ईव्हीएमचा दुरुपयोग केल्याचा आरोप केला जात होता. अनेक प्रकरणे तर न्यायालयातही पोहोचली आहेत. याच अनुषंगाने ईव्हीएमसंदर्भात असलेली शंका दूर करण्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून तयारी केली जात होती. त्या तयारीचा पहिला प्रयोग नांदेड महापालिकेत होणार आहे. महापालिकेच्या एका प्रभागातील सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार असून मतदारांना आपण कुणाला मतदान केले याची माहिती व्हीव्हीपॅट मशीनवर दिसणार आहे. त्याचवेळी मतदारांनी केलेल्या मतदान चिन्हाची पावतीही मतदान केंद्रातील एका बॉक्समध्ये राहणार आहे. या पावतीचे आयुष्य पाच वर्षांचे राहणार आहे. त्यामुळे भविष्यात व्हीव्हीएमबाबतच्या तक्रारींना आळा घालण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाणार आहे.नांदेड महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यासंदर्भातील तयारी मागील महिनाभरापासून केली जात होती. हैदराबादच्या ईसीएल कंपनीच्या प्रतिनिधींनी नांदेडमध्ये व्हीव्हीपॅट मशीन वापराबाबतचे प्रशिक्षणही दिले होेते. मात्र आठ दिवसांपूर्वीच राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी नांदेड महापालिकेच्या तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या आढावा बैठकीनंतर महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापराबाबत अनिश्चितता असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरले जाईल की नाही, याबाबत साशंकताच होती. मात्र महापालिका आयुक्त देशमुख, उपायुक्त संतोष कंदेवार, रत्नाकर वाघमारे आदींच्या पाठपुराव्यानंतर नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन वापरास राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेच्या २० पैकी एका प्रभागात व्हीव्हीपॅट मशीनचा वापर केला जाणार आहे.महापालिकेच्या एकूण २० प्रभागांपैकी कोणत्या प्रभागात व्हीव्हीपॅटचा वापर करायचा याबाबत सोडतीद्वारे निर्णय घेतला जाणार आहे. २१ सप्टेंबर रोजी शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली जाईल. या बैठकीत व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत राजकीय पक्षांना माहिती दिली जाणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सोडत काढली जाणार असून व्हीव्हीपॅट मशीन वापरासाठी प्रभाग निश्चित केला जाणार आहे.प्रभाग निश्चितीनंतर त्या प्रभागातंर्गत असलेल्या सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. निवडणूक विभागाकडून तेथील निवडणूक कर्मचाºयांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण दिले जाईल, असेही आयुक्त गणेश देशमुख यांनी स्पष्ट केले.व्हीव्हीपॅटचा हा पहिलाच प्रयोग असल्याने नांदेडकरांमध्येही उत्सुकता आहे़
एकाच प्रभागात ‘व्हीव्हीपॅट’ चा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:48 AM