औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेची शहर वाहतूक बस अगोदरच तोट्यात धावते आहे. कोरोनाकाळात महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या तब्बल ६० बसेसचा वापर केला. त्याचा मनपा आणि जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत एक रुपयाही मोबदला दिला नाही. उलट प्रवाशांना दिलेल्या विविध सवलतीची रक्कम महापालिकेने थकविली आहे.
शहरात कोरोनाबाधितांची व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी मनपा प्रशासनाने स्मार्ट सिटीच्या बसचा वापर सुरू केला. ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तर शहरासाठी महापालिकेने या बसेसचा वापर केला. कोरोनाकाळातील बसचा आणि चालकांचा संपूर्ण खर्च स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने केला. आता या खर्चाचा परतावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेकडे मागितला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ४७ लाख रुपये तर महापालिकेकडे १ कोटी ४६ लाख रुपये थकले आहेत. ही रक्कम स्मार्ट सिटी बस विभागाला मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे.
सिटी बस चालवताना महापालिकेने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रवाशांना तिकिटात काही सवलती दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने विद्यार्थी, दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. १ कोटी ६ लाख रुपयांच्या सवलती स्मार्ट सिटी बस विभागाने प्रवाशांना दिल्या आहेत. ही रक्कम महापालिकेने स्मार्ट सिटी बस विभागाला द्यावी, अशी मागणीही विभागाने केली आहे. सुमारे तीन कोटी रुपये जिल्हाधिकारी व महापालिका कार्यालयाकडे अडकून पडल्यामुळे स्मार्ट सिटी बस अडचणीत येण्याची शक्यता आहे. अगोदरच स्मार्ट सिटी बसला किलोमीटरमागे किमान ४५ ते ५० रुपये तोटा सहन करावा लागत आहे.