औरंगाबाद: सायकल चोर म्हणून पोलिसांना परिचित असलेल्या एका चोरट्याने अल्पवयीन मुलाला(विधीसंघर्षग्रस्त)सोबत घेऊन उस्मानपुरा परिसरातून पाच दुचाकी आणि तीन महागड्या सायकली पळविणाऱ्या चोरट्याला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली. या चोरट्याकडून चोरीच्या पाच दुचाकीसह आठ वाहने जप्त केल्या.
नदीम खान नजीर खान (वय २३,रा.शम्सनगर, शहानुरवाडी)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, नदीम खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सायकल चोर आहे. सायकली चोरता,चोरता तो मोटारसायकल चोर बनला आणि गेल्या काही महिन्यामध्ये त्याने १७वर्षीय तरुणाला सोबत घेऊन उस्मानपुरा परिसरातून पाच मोटारसायकली आणि तीन महागड्या सायकली चोरल्या.
उस्मानपुरा ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, कर्मचारी संजयसिंग डोबाळ, मनोज बनसोडे, संतोष शिरसाठ यांच्या पथकाला नदीमखान हा दुचाकी चोरी करीत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानंतर त्याला संशयावरून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अल्पवयीन मुलासोबत मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. यात तीन मोटारसायकली आणि दोन मोपेडचा समावेश आहे. शिवाय महागड्या तीन सायकलीही त्यांनी चोरल्याचे सांगितले. चोरलेली सर्व वाहने त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवली होती. ही वाहने त्याने पोलिसांना काढून दिली.आरोपीचा साथीदार असलेल्या विधीसंघर्षग्रस्त मुलाला बालन्यायमंडळासमोर हजर करून त्याची रवानगी बालसुधारगृहात केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.