छत्रपती संभाजीनगर : ‘गझल क्या होती है... रेशम मे लिपटी हुवी आग सी होती है’ या उक्तीचा प्रत्यय प्रख्यात सितारवादक शुजात खान यांनी रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या दर्दी रसिकांना दिला...‘‘मुझे फुकने से पहिले, मेरा दिल निकाल लेनाकिसी और की अमानत कही साथ जलना जाये’’.
या शायरीने अक्षरश: सर्वांच्या अंगावर शहारे आणले. उस्तादजी म्हणाले, ‘अभी तो धडकेगा दिल जियादा अभी मोहब्बत नई नई’ ... रसिक म्हणाले, ‘दिल तो अभी भरा नही’... उस्तादजींनी गझल गात राहावी आणि आम्ही तासनतास नुसते श्रवण करत राहावे.. अशीच अवस्था प्रत्येकाची झाली होती.
लोकमत आणि हॉटेल हयात प्लेस प्रस्तृत ‘उस्ताद शुजात खान’ यांच्या मैफलीने रविवारची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. कातर वेळ... हॉटेल हयात प्लेसची हिरवळ... स्पर्श करून जाणारी थंडी, अशा गुलाबी वातावरणात उस्तादजींची बोटं सितारच्या तारेवर थिरकू लागली अन् धून थेट रसिकांच्या हृदयाला भिडली... त्यांनी रागदरी आणि लयकरी पेश करीत शास्त्रीय संगीताचे माधुर्य काय असते याची अनुभूती रसिकांना दिली. प्रारंभी अर्धा तास सितारचे मधुर स्वर ऐकताना दर्दी श्रोत्यांची ब्रह्मानंदी टाळी लागली. सर्वजण एवढे तल्लीन होऊन गेले, की दिवसभराचा थकवा क्षणात दूर पळून तणावमुक्तीचा परमानंद सर्वांना झाला.
यानंतर त्यांनी लोकप्रिय कृष्णबिहारी ‘नूर’ यांची‘‘जिंदगी से बडी सजा ही नहीऔर क्या जुर्म है पता ही नही’‘
ही गझल तेवढ्याच तल्लीनतेने सादर केली...‘ इतने हिस्सों में बंट गया हूँ मेै,मेरे हिस्से में कुछ बचा ही नही’
या शेरला सर्वाधिक टाळ्या मिळाल्या... ‘वाह उस्ताद वाह’ अशी उत्स्फूर्त दाद रसिकांनी दिली.
यानंतर ‘रात कटती नही, दिन गुजरता नही हाय, ये जिंदगी क्या से क्या हो गई’ ही दुसरी गझल सादर केली.‘कोई शिकवा मुझे दुश्मनोसे नहीमेरी तकदीर ही वेबफा हो गयी’असे एकापेक्षा एक आशयगर्भ शेर उस्तादजीच्या कंठस्वरातून निघालेले शब्द रसिकांच्या हृदयाचा नकळत ठाव घेत होते.
‘खामोश लब हैं झुकी हैं पलकें,दिलों में उल्फत नई-नई है,अभी तकल्लुफ है गुफ्तगू में,अभी मोहब्बत नई-नई है’‘अशा भावनांची परकोटीची तीव्रता, काहीशा मिश्कील आणि प्रभावीपणे व्यक्त केली जात होती.
‘छाप तिलक सब छीनी रे मौसेनैना मिलाईके’ या ब्रज भाषेतील अमीर खुसरो यांच्या सर्वांत प्रसिद्ध सुफी रचनाचे सूर सितारातून प्रकटले आणि वातावरण भक्तिमय झाले. यात त्यांनी ‘वैष्णव जन तो तेने कहिये’ व ‘हरे कृष्णा हरे रामा’ या भक्तिगीताचे फ्यूजन करीत रसिकांना आध्यात्मिकतेचे ‘सरप्राईज’ दिले. जुहेब अहमद, शारीक मुस्तफा यांनी त्यांना तबल्यावर, तर प्रतीककुमार यांनी ढोलकीवर तेवढ्याच ताकदीने साथ दिली.