औरंगाबाद: कर्ज देण्याचे अमिष दाखवून उत्तरप्रदेशातील एका कंपनीने औरंगाबादेतील ३२ जणांना तब्बल २१ लाख ४ हजार ९६० रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी कंपनीच्या अध्यक्ष, सचिवाविरोधात पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
अध्यक्ष यशोदीप धर आणि सचिव पुलचीत गोयल अशी गुन्हा नोंद झालेल्या कंपनीच्या अध्यक्ष आणि सचिवाचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांंनी सांगितले की, उत्तरप्रदेशातील मेरट येथील बानी अॅण्ड सन्स फायनान्स सोल्युशन प्रा. लि. या कंपनीचे विभागीय कार्यालय गारखेडा परिसरातील विजयनगर येथे होते. तक्रारदार सुनीता जनार्दन निर्मल (रा. छत्रपतीनगर)या २०१५ मध्ये नोकरीच्या शोधात असताना वर्तमानपत्रातील जाहिरात वाचून त्यांनी बानी अॅण्ड सन्स कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी कंपनीने त्यांना एरिया मॅनेजर म्हणून नियुक्त केले. इच्छुकांकडून कर्ज प्रस्ताव घेऊन तो कंपनीच्या वेबसाईटवर पाठविणे. कर्ज फाईल प्रोसेसिंग शुल्क आणि जीएसटी स्वरूपात अर्जदारांकडून रक्कम घेऊन ती कंपनीच्या खात्यात जमा करण्याचे काम त्यांना देण्यात आले होते.
मंजूर होणा-या कर्जावर त्यांना कमिशन स्वरूपात मोबदला देण्याचे आश्वासन कंपनीने दिले होते. त्यामुळे दरम्यानच्या काळात सुनीता यांनी ३२ कर्ज प्रस्ताव कंपनीला सादर करून प्रोसेसिंग शुल्क आणि जीएसटी स्वरूपात २१ लाख४ हजार ९६० रुपये कंपनीच्या बँक खात्यात जमा केले. मात्र आरोपी कंपनीने त्यापैकी एकाही कर्जदाराला कर्ज मंजूर केले नाही. अर्जदार कर्जासाठी सुनीता यांच्या कार्यालयात चकरा मारू लागले. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे अध्यक्ष यशोदीप धर आणि सचिव पुलचीत गोयल त्यांनी त्यांचे मोबाईल आणि फोन नंबर बंद करून टाकले. आरोपींनी आपली आणि कर्जासाठी अर्ज करणा-यांची फसवणुक केल्याची फिर्याद सुनीता यांनी पुंडलिकनगर ठाण्यात शुक्रवारी नोंदविली.