औरंगाबाद : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शहरातील सहा केंद्रांवर शुक्रवारी ११३७ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. प्रत्येक केंद्रावर कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येत आहे. एका केंद्रावर फक्त दोनशे नागरिकांना लस देण्याची व्यवस्था आहे. शनिवारीसुद्धा अशाच पद्धतीने लस देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
कोविन ॲपवर नागरिकांना दररोज रात्री ८.३० ते १०.०० वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. ज्या नागरिकांची नोंदणी यशस्वीपणे झाली आहे त्यांना एसएमएस प्राप्त होत आहेत. त्यांनी संबंधित आरोग्य केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे नियोजन करण्यात आले आहे. सुरुवातीला प्रत्येक केंद्रावर शंभर नागरिकांनाच देण्यात येत होती. शुक्रवारपासून ही संख्या दुप्पट करण्यात आली आहे. आता दररोज २०० नागरिकांना लस देण्यात येत आहे. राज्य शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात महापालिकेला दस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सहा केंद्रांवर नियोजन केले आहे. शुक्रवारी सकाळी ठीक दहा वाजता लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ज्या नागरिकांना लस घेण्यासंदर्भात मेसेज प्राप्त झाला आहे, त्यांनीच केंद्रांवर गर्दी केली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील सादात नगर येथील केंद्रावर दुपारी दीड वाजेपर्यंत १५० नागरिकांना लस देण्यात आली होती. उर्वरित ३० जणांना तासाभरात लस देण्यात येईल, असे डॉ. शोएब शेख यांनी सांगितले. या ठिकाणी प्रत्येक रुग्णांना टोकन देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. गणेश कॉलनी-आलमगीर कॉलनी या केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांना लक्ष देण्यात येत होती. दुपारनंतर येथे गर्दी कमी होती. दिवसभरात १८९ नागरिकांना लस दिल्याचे डॉ. तलत काझी यांनी सांगितले.
५६९ नागरिकांना कोविशिल्ड लस
सादातनगर - १८०
कैसर कॉलनी - २००
मुकुंदवाडी - १८९
५६८ नागरिकांना कोवॅक्सिन लस
चेतनानगर, हर्सूल - १८८
क्रांती चौक - १९१
गणेश कॉलनी - १८९