याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार यांनी अन्य सहकाऱ्यासोबत १० फेब्रुवारी रोजी चिकलठाणा सिव्हिल रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लस घेतली. या लसीकरणानंतर दोन दिवसांनी ते कामावर असताना त्यांना ताप आला. यामुळे १५ फेब्रुवारी रोजी रजा घेऊन त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखविले. डॉक्टरांनी त्यांना तपासून औषधे दिली. मात्र ताप कमी झाला नाही, यामुळे त्यांनी पुन्हा रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्यांची एक्स रे तपासणी केली. यानंतर त्यांची कोविड तपासणी करण्यात आली. कोविड तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना लसीकरणानंतरही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे याबद्दल पोलीस वर्तुळात चर्चा सुरू आहे. याआधीही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या एका पोलिसाचा शहरात कोरोनासदृश आजाराने मृत्यू झाला आहे.
लस घेतलेल्या हवालदाराला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:06 AM