औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग कमी असल्यामुळे राज्य शासनाने सर्व निर्बंध हटविले. दोन दिवसांपासून शहरातील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. बाजारात खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. व्यापारी, हॉटेल व्यावसायिक सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे सर्वांत अगोदर त्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. उद्या, गुरुवारपासून लस देण्याबाबत नियोजन करण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
शहरातील निर्बंध शिथिल झाल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. पहिल्या लेव्हलमध्ये शहर असल्यामुळे नागरिकांवर ही लेव्हल सांभाळण्याची मोठी जबाबदारी आहे. कायम पहिल्या लेव्हलमध्ये राहण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. शहरातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी पूर्णपणे कोरोना संपलेला नाही. कोरोनाचे सुपर स्प्रेडर असलेली ठिकाणे आणि व्यक्ती यांच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. त्याकरिता शहरातील व्यापारी व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी, हॉटेलचालक व कर्मचारी यांचे लसीकरण करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्याकरिता कोविन अॅपमध्ये स्वतंत्र साईट सुरू करून त्यामध्ये नोंदणी केली जाणार आहे. व्यापारी व हॉटेलचालकांचे लसीकरण उद्यापासून करण्याबाबत नियोजन सुरू आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्वच व्यापारी आणि हॉटेलचालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोरोना चाचणीसाठी चार केंद्रे
शहरात व्यापाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी चार केंद्रे सुरू केली आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या ठिकाणी चाचण्या केल्या जातील. बायजीपुरा आरोग्य केंद्र, औरंगपुरा आरोग्य केंद्र, संत तुकाराम नाट्यगृह सिडको एन ५, एमआयटी कॉलेज इमारत क्रमांक २. या केंद्रावर चाचणी केली जाणार आहे.