रऊफ शेख
फुलंब्री : तालुक्यात जसा कोरोनाने धुमाकूळ घातला आहे, तसाच काही गावांमध्ये जनावरांवरही साथरोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. माणसांना मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यासाठी सगळीकडे लसीकरण सुरू झाले. मात्र, लसींच्या तुटवड्यामुळे हे लसीकरण अधांतरीच लटकले आहे, तर दरवर्षी मान्सूनपूर्वी जनावरांना साथरोगापासून वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विविध लसीकरण केले जाते. मात्र, यंदा मान्सून जवळ आला तरी, लसीच उपलब्ध नसल्याने हे लसीकरणही अधांतरीच लटकले आहे. यामुळे माणसांसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
फुलंबी तालुक्यात गाय, बैल, म्हैस, बकऱ्या, मेंढ्या या पाळीव जनावरांची संख्या ही १ लाख २० हजार ३२८ इतकी असल्याची शासकीय दरबारी नोंद आहे. या जनावरांवर पावसाळ्यात लाळ-खुरकुत, आंत्रविषार अशा विविध साथरोगाचा प्रादुर्भाव होत असतो. वेळेवर लसीकरण झाले नाही, तर बाधित जनावरांचा या रोगामुळे जीव जातो. या रोगांपासून बचाव करण्यासाठी त्यांना दरवर्षी मान्सूनपूर्वीच लसीकरण केले जाते. कोरोनामुळे मागील वर्षी उशीरा ही लस जनावरांना टोचण्यात आली होती. यंदाही सर्व यंत्रणेचे लक्ष कोरोनाकडे लागल्याने लसीकरण अद्यापही झालेले नाही. ते कधी होईल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
चौकट
मान्सून जवळ आला तरी लसीकरण नाही
तालुक्यात बैल, म्हैस, शेळ्या,में ढ्या यांची संख्या लाखावर आहे. या जनावरांना दरवर्षी मान्सूनपूर्व फऱ्या व घटसर्प या दोन रोगांच्या प्रतिबंधक लसी दिल्या जातात. गेल्या वर्षभरापासून कोरोना काळ सुरू असल्याने मागील वर्षीही लसीकरणाची तारीख हुकली होती. यंदा तर मान्सून जवळ आलेला असतानाही लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हे लसीकरण लटकणार असल्याचे चित्र आहे.
फुलंब्री तालुक्यात जनावरांची संख्या
बैल -गाय ५८०५२
म्हैस ६६५६
मेंढ्या १७७२६
शेळ्या ३३८९४
......................................
एकूण संख्या १२०३२८
चौकट
जनावरांना दिल्या जाणाऱ्या लसी
मान्सूनपूर्वी जनावरांना फऱ्या व घटसर्प ही लस दिली जाते तर ऑक्टोबर महिन्यात लाळ-खुरकुताची लस दिली जाते.
तसेच मेंढ्या व शेळ्यांना आंत्रविषार ही लस दिली जाते. नोव्हेंबर महिन्यात दिली जाणारी लस कोरोना काळामुळे एक महिना उशिराने म्हणजे डिसेंबर महिन्यात दिली गेली. आता मेमध्ये मान्सूनपूर्वी दिली जाणारी लस उपलब्धता नसल्याने थांबलेली आहे. यामुळे पशुपालकांना चिंता लागलेली असून माणसांवर कोरोनाचा संसर्ग होत आहे. यामुळे जनावरांनाही एखाद्या रोगाचा प्रदुर्भाव होईल, अशी भीती पशुपालकांत आहे.
कोट
दरवर्षी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वेळेवर जनावरांचे लसीकरण करण्यात येते. मात्र, मान्सूनपूर्वी दिली जाणारी लस अजून उपलब्ध झालेली नाही. लस उपलब्ध होताच, ती जनावरांना दिली जाईल.
- बळीराम गायकवाड, सहायक आयुक्त, पशुसंर्वधन विभाग
कोट
माझ्याकडे चार बैल, पाच गायी, एक म्हैस अशी जनावरे आहेत. या जनावरांना दरवर्षी पशुसंवर्धन विभागाकडून विविध रोगांना प्रतिबंध करणाऱ्या लसींचे लसीकरण केले जाते; पण यंदा अजूनतरी लसीकरण झालेले नाही. ते लवकर होण्याची गरज आहे
- दिगंबर पवार, पशुपालक शेतकरी, मुर्शिदाबादवाडी तालुका फुलंब्री
कोट
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना दिली जाणारी लस मान्सून जवळ आला तरी अजून देण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीही यात अंतर पडले होते. यंदाही लसीकरण लांबते की काय, असा प्रश्न पडला आहे.
-नवाब राजू पटेल, शेतकरी, धामणगाव