औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राला प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते एकाच दिवसात गुंडाळण्याची नामुष्की प्रशासनावर आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षक- कर्मचाऱ्यांकडून परिसरातील आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने महापालिका प्रशासनाला पत्र दिले. या लसीकरण केंद्राद्वारे पहिल्या टप्प्यात विद्यापीठ परिसरातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षा रक्षक अशा ४५ वर्षांवरील सुमारे दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते, तर दुसऱ्या टप्प्यात या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण केले जाणार होते. मात्र, तिथे पहिल्याच दिवशी अवघ्या १० जणांनी लसीकरण करून घेतल्यामुळे महापालिकेने नंतर त्या ठिकाणी लसींचा पुरवठा करण्यास नकार दिला. त्यामुळे विद्यापीठाला ते लसीकरण केंद्रच बंद करावे लागले.
विद्यापीठ आरोग्य केंद्र येथे १४ जूनपासून कोविड लसीकरण केंद्राला सुरुवात करण्यात आली. तिथे दररोज सुमारे १०० कर्मचाऱ्यांना लसीचे डोस देण्याचे नियोजन होते. विद्यापीठाने लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करण्याचे आवाहनही केले होते. लसीकरणाच्या दिवशी संबंधितांनी ओळखपत्र व आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, विद्यापीठ आरोग्य केंद्रात फक्त २१ जणांनीच लसीकरणासाठी नोंदणी केली व दहा जणांनीच लसीकरण करून घेतले. त्यामुळे लसीचा साठा घेऊन विद्यापीठ आरोग्य केंद्रात गेलेल्या मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांचा चांगलाच हिरमोड झाला. हे वास्तव त्यांनी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. पाडळकर यांनी विद्यापीठ आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला.
चौकट......
अतिशय अल्प प्रतिसाद
विद्यापीठ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमवंशी यांनी सांगितले की, विद्यापीठातील अधिकारी-कर्मचारी, शिक्षकांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते; पण अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्यामुळे लसीकरण केंद्र बंद करावे लागले. लसीकरणासाठी महापालिकेचे आरोग्य कर्मचारी आले होते. नोंदणी केलेल्यांपैकी फक्त दहाच लोकांनी लसीकरणासाठी हजेरी लावल्यामुळे मनपाने या केंद्रावरील लसीच्या वायल परत नेल्या.