औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा म्हणून काही दिवसांपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरात ९२ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. ८१ हजार नागरिकांनी पहिला, तर ११ हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला. येत्या महिनाभरात आणखी २ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट मनपाने निश्चित केले आहे. कोरोना संसर्गाने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगलेच हात-पाय पसरले आहेत. प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. मात्र, त्याचा काहीच फरक पडलेला नाही.
१ मार्च २०२१ पासून पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. शहरात दररोज १२०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मनपाने नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यासोबतच यंदा कोरोनावरील प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने या लसीकरणावरही भर दिला जात आहे. शहरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना, त्यानंतर कोरोना काळात फ्रंटलाइन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यापाठोपाठ १ मार्चपासून शहरात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे या वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात झाली आहे.
प्रत्येकाला कोरोना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. पहिला डोस घेतल्याच्या सहा आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जात आहे. अगदी सुरुतीला पहिला डोस घेतलेल्या अनेकांना आतापर्यंत दुसरा डोसही मिळाला आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांनाच ही लस दिली जाणार आहे. मनपा प्रशासनाने एप्रिलअखेर एकूण ३ लाख नागरिकांना डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. आतापर्यंत एकूण ९२ हजार लसींचा वापर झाला आहे. शहरातील ८१ हजार जणांना पहिला डोस मिळाला आहे. शिवाय यातील अकरा हजार जणांना दुसरा डोसही मिळाला असल्याचे मनपा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.