पाच महिन्यांनंतर मिळणार गती
यंत्रसामग्री दाखल : १५ दिवसांत पूर्ण होणार स्टोअरचे काम
औरंगाबाद : शहरातील छावणी परिसरात प्रत्येकी २० क्युबिक मीटर क्षमतेचे लस साठवणुकीचे दोन युनिट (स्टोअर) तयार करण्याचे काम जानेवारीत सुरू झाले; परंतु तब्बल पाच महिन्यांनंतर आवश्यक यंत्रसामग्री दाखल झाली आहे. त्यामुळे आता कुठे स्टोअरच्या कामाला गती मिळणार आहे.
शहरात आजघडीला सिडकोतील कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांत वाक इन फ्रीजर आणि वाक इन कुलर आहे. या दोन्हींची क्षमता प्रत्येकी १२ क्युबिक मीटर आहे. उपसंचालक कार्यालयातही कोल्ड स्टोअरेज आहे. औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली हे चार जिल्हे आहेत. या जिल्ह्यांसह लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि बीड या चार जिल्ह्यांना औरंगाबादेतून लसींचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने शहरातील छावणी परिसरात प्रत्येकी २० क्युबिक मीटर क्षमतेचे लस साठवणुकीचे २ युनिट (स्टोअर) तयार करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक बांधकाम, रंगकाम करण्यात आले. प्रत्यक्षात यंत्र मिळण्याची प्रतीक्षाच करावी लागत होती. अखेर दिल्लीहून आवश्यक यंत्र प्राप्त झाले आहे. आगामी १५ दिवसांत छावणीतील स्टोअरचे काम पूर्ण होईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले.
फोटो ओळ..
छावणीतील लसींच्या स्टोअरसाठी दिल्लीहून दाखल झालेली यंत्रसामग्री.